Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत तरूणाचा भोसकून खून, एकजण गंभीर जखमी पूर्ववैमनस्यातून चार ते पाचजणांचे कृत्य

सांगलीत तरूणाचा भोसकून खून, एकजण गंभीर जखमी
पूर्ववैमनस्यातून चार ते पाचजणांचे कृत्य



सांगली : खरा पंचनामा

शहरातील गणपती मंदीर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरूणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करत भोसकून खून करण्यात आला. या हल्ल्यात मृत तरूणाचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेनंतर सांगली शहर पोलिसांसह एलसीबीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील संशयितांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना पकडण्यात येईल असे सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. 

राहुल संजय साळुंखे (वय २४, रा. जामवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर या हल्ल्यात मृत राहुलचा साथीदार तेजस कारंडे जखमी झाला आहे. जामवाडी आणि गवळी गल्ली परिसरातील चार ते पाच तरूणांची हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात मिळाली आहे. शिवाय मृत राहुल आणि हल्लेखोर यांच्यात पूर्वी काही कारणावरून वाद झाला होता त्यातूनच त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

बुधवारी रात्री राहुल साळुंखे आणि त्याचा साथीदार तेजस कारंडे गणपती मंदीर परिसरात गेले होते. तेथे संशयित हल्लेखोरही गेले होते. त्यावेळी त्यांच्यात पूर्वीच्या भांडणातून वाद झाला. त्यानंतर संशयितांनी धारदार शस्त्रांनी राहुल आणि तेजस यांच्यावर हल्ला केला. राहुल याच्या पोट, छाती तसेच पाठीवर सपासप वार करण्यात आले. शिवाय तेजसवरही वार करण्यात आले. यामध्ये राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. 

ही घटना घडल्यानंतर सांगली शहर पोलिस तसेच एलसीबीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे राहुल याला मृत घोषित करण्यात आले तर तेजसवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान हल्लेखोरांच्या शोधासाठी सांगली शहर आणि एलसीबीची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.