काँग्रेसचे चिन्ह सांगलीतून हद्दपार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची लवकरच नावे जाहीर करु
मी जनतेचा उमेदवार : विशाल पाटील
सांगली : खरा पंचनामा
सांगली लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून आता अपक्ष निवडणूक लढवणार आहे. त्यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता सांगलीमध्ये तिहेरी लढत होणार आहे.
अशामध्ये लिफाफा चिन्ह मिळाल्यानंतर विशाल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीने शेवटपर्यंत निर्णय न घेतल्यामुळे दुःख व्यक्त केले. 'हा जनतेचा लढा आहे. त्यामुळे माघार हा पर्याय नाही.', असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले.
विशाल पाटील यांनी सांगितले की, 'काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गेली ९० ते ९५ वर्षे काँग्रेससाठी राबणाऱ्या पक्षाला आणि जिल्ह्याला न्याय देतील अशी अपेक्षा होती. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही त्यामुळे अत्यंत दुःख वाटले. त्यानंतरही आशा होत्या की ज्या उमेदवाराला महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली होती. त्या उमेदवाराला सर्व वस्तुस्थिती समजावून सांगत माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत तो अर्ज काढून घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर करतील ही अपेक्षा होती. पण तेही आज झाले नाही. १६ तारखेला कार्यकर्त्यांनी सांगितले होते की माघार हा पर्याय नाही'.
विशाल पाटील यांनी पुढे सांगितले की, 'पण महाविकास आघाडीतील काही घटकांनी कुठल्या तरी न कळणाऱ्या कारणांसाठी या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला. शेवटपर्यंत प्रयत्न करताना देखील तुम्ही त्याला काढले नाही. त्यामुळे आज अपक्ष म्हणून मी लिफाफा हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे. माझा अर्ज निघाल्यानंतर मी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न केले गेले. मला वैयक्तिकरित्या आणि आमच्या कुटुंबीयांना वेगवेगळ्या प्रकारची पदं देण्याची आश्वासनं देण्यात आली. आम्हाला ऑफर दिल्याबद्दल सर्व नेत्यांचे आभार मानतो.', असे म्हणत विशाल पाटील यांनी काँग्रेस नेत्यांचे आभार मानले आहे.
तसंच, 'हा लढा आणि संघर्ष फक्त विशाल पाटील याचा नाही. मला एखादं पद पाहिजे यासाठी हा लढा उभा राहिला नाही. मला स्वार्थ असता तर मिळणारे पद घेऊन मी माघार घेतली असती. हा लढा जनतेचा आहे. मी जनतेचा उमेदवार आहे. मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे. मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून समजतो. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता भक्कमपणे माझ्यापाठीशी उभा आहे. आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव हा काँग्रेस पक्षच या जिल्ह्यात करू शकतो.', असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे. काँग्रेस पक्षाचे चिन्ह या जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. त्याच्यामागे कोण आहे हे काही दिवसांत आम्ही सांगू. जसे आघाडीतील इतर पक्ष म्हणतात तसं सांगलीमध्ये काँग्रेस पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणूकीत काँग्रेसचा खासदार निवडून देणार. ही सांगलीच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार. सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार. सांगलीकरांचा उमेदवार म्हणून मी कुठल्याही आमीषाला बळी न पडता हा लढा लढणार. हे आव्हान मी स्वीकारले आहे. लिफाफा हे चिन्ह मिळाले आहे. जनतेने या लिफाफाच्या माध्यमातून आम्हाला प्रेम द्यावे आणि अडचणी सांगाव्या.', असे आवाहन विशाल पाटील यांनी सांगलीकरांना केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.