Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कॉंग्रेसचे चिन्ह नाही तर मतदान कोणाला करू? महिलेच्या भूमिकेने मतदान अधिकाऱ्यांची तारांबळ

कॉंग्रेसचे चिन्ह नाही तर मतदान कोणाला करू?
महिलेच्या भूमिकेने मतदान अधिकाऱ्यांची तारांबळ



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यात मंगळवारी लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. पण काही मतदारांच्या चमत्कारीक वर्तणुकीने मतदान अधिकाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. असाच एक प्रकार सांगली जिल्ह्यात घडला. सांगलीतील सह्याद्रीनगर येथील एका मतदान केंद्रावर कॉंग्रेसचे चिन्हच नसल्याने महिलेने मतदान करण्यास नकार दिला. या घटनेमुळे मतदान अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिंग बुथवरील कार्यकर्त्यांनी महिलेची समजूत काढल्यानंतर त्या महिलेने अखेर मतदान केले. 

सांगली शहरातील सह्याद्रीनगर येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास ५० ते ५५ वयोगटातील एक महिला मतदानासाठी या केंद्रावर आली. मतदान केंद्रात गेल्यानंतर सुरुवातीचे सोपस्कार पार पडले. मतदान अधिकाऱ्यांनी या महिलेच्या बोटाला शाईही लावली. त्यानंतर महिला मशीनकडे मतदानासाठी गेली. बराच वेळ मशीनचे निरीक्षण केल्यानंतर ती महिला मतदान न करताच तेथून बाहेर पडली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्या केंद्रातील मतदान अधिकाऱ्यांनी महिलेला तुमचे मतदान झाले नाही ते करा अशी विनंती केली. 

त्यानंतर या महिलेने मतदान अधिकाऱ्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे चिन्हच मशीनवर नाही त्यामुळे मी मतदान करणार नाही अशी भूमिका महिलेने घेतली. महिलेच्या या भूमिकेमुळे मतदान अधिकाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. त्यांनी महिलेला बऱ्याच विनवण्या केल्या मात्र कॉंग्रेसचे चिन्ह नसल्याने मतदान न करण्यावर महिला ठाम होती. त्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी तेथील पोलिंग बूथवर असलेल्या कार्यकर्त्यांना महिलेची समजूत काढण्याची विनंती केली. 

त्यानंतर तेथील पोलिंग बूथवर असलेल्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी महिलेची समजूत काढली. कार्यकर्त्यांनी बराच वेळ समजूत काढल्यानंतर ती महिला मतदान करण्यास तयार झाली. त्या महिलेचे मतदान झाल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.