Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इंदापुरात तहसीलदारावर हल्ला, पोलिसांनी सात तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

इंदापुरात तहसीलदारावर हल्ला, पोलिसांनी सात तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्याइंदापुर : खरा पंचनामा

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या सात तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.

बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी याबाबत माहिती दिली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर शुक्रवारी सकाळी इंदापूर शहरातील संविधान चौकात अज्ञातांनी हल्ला केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सात तासात पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी यापूर्वी केलेल्या गौण खनिजाच्या कारवाईतून मनात राग धरून हा हल्ला करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

तहसीलदारांवर हल्ल्याची घटना ही शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भर चौकात घडली. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हल्लेखोरांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? हल्लेखोरांच्या डोक्यावर कुणाचा हात आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. आता पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. तपासात काय-काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

या घटनेनंतर श्रीकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. “मी नेहमीप्रमाणे इंदापूर प्रशासकीय भवनाकडे निघालो होतो. माझी गाडी संविधान चौकात आली तेव्हा चारचाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी रॉडने त्याने थेट माझ्यावर हल्ला चढवला. आमच्या अंगावर मिरचीची पूड उधळली. त्यावेळी माझ्या गाडीत माझा चालक आणि मी होतो. आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आणखी दोन ते तीन हल्लेखोर गाडीतून उतरून आले. त्यांनी देखील आमच्यावरती हल्ला चढवला आणि ते फरार झाले", असा थरार श्रीकांत पाटील यांनी सांगितला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.