Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपाचा माजी नगरसेवक उमेश सावंत न्यायालयात शरण जतचे माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरण : सावंतने चौदा महिने दिला होता चकवा

भाजपाचा माजी नगरसेवक उमेश सावंत न्यायालयात शरण
जतचे माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरण : सावंतने चौदा महिने दिला होता चकवा



सांगली : खरा पंचनामा

जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खूनप्रकरणी चौदा महिने पोलिसांना चकवा देणारा पसार झालेला भाजपाचा माजी नगरसेवक, संशयित उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) आज बुधवारी न्यायालयात शरण आला. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. आता जत पोलिस न्यायालयातून त्याचा ताबा घेतील, असे सांगण्यात आले.

दि. १७ मार्च २०२३ रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मृत विजय ताड हे मोटार (एमएच १० सीएन ०००२) मधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन पिस्तुलाने गोळीबार करुन अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात त्यांचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला होता. याबाबत जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ताड यांच्या खुनप्रकरणी एलसीबीने बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७ रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश उर्फ दाया दिनकर मदने (वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज), आकाश सुधाकर इनखंडे (वय २४ रा. के एम हायस्कुलजवळ सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (वय २७ रा. आर. आर. कॉलेजजवळ जत) या चौघांना अटक केली. पोलिस तपासात चौघांकडून गुन्हयात वापरलेली तीन पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, दोन जादा मॅग्झीन, सहा पुंगळ्या, दोन दुचाकी, दोन एअरगन जप्त करण्यात आली होती.

ताड यांचा खून मुख्य सुत्रधार उमेश सावंत याच्या चिथावणीवरुन तसेच नियोजन करुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. खुनानंतर उमेश सावंत हा पसार झाला होता. त्याची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगून २५ हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. खुनातील संशयित पाच आरोपींना मोका देखील लावण्यात आला होता. 

उमेश सावंत हा पोलिसांना चकवा देत असताना त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळला होता. दरम्यान, उमेश सावंत हा जिल्हा न्यायालयात आज शरण आला. न्यायाधीशांनी त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.