Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"ईव्हीएम यंत्र आमच्या बापाचे" बोगस मतदानप्रकरणी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक

"ईव्हीएम यंत्र आमच्या बापाचे" 
बोगस मतदानप्रकरणी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक



अहमदाबाद : खरा पंचनामा

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर बुधवारी (दि. ८ मे) गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील दाहोड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान केल्याप्रकरणी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

मतदान करताना फेसबुक लाईव्हही यावेळी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. काँग्रेसने या दोन कार्यकर्त्यांवर बोगस मतदान केल्याचा आरोप केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. या दोन कार्यकर्त्यांनी जवळपास २५ मतदान केंद्रांना भेट दिली आहे. तसेच संतरामपूर येथे विविध ठिकाणी बोगस मतदान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

आरोपी विजय बाभोर (वय २८) याने मतदान करतानाचे फेसबुक लाईव्हदेखील केले होते. या व्हिडीओमध्ये आरोपी विजय प्रथमपूर येथील एका बूथमध्ये प्रवेश केल्याचे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देत असल्याचे दिसत आहे. विजय भाभोर म्हणतो, 'आम्हाला १० मिनिटे द्या. आम्ही इथे बसतो. सकाळपासून मतदान सुरू आहे. असे चालणार नाही. इथे फक्त भाजपाच चालणार. ईव्हीएम मशीन आमच्या बापाची आहे.'

याशिवाय विजय भाभोर हा इतर मतदारांनाही कमळ चिन्हाचे बटण दाबावे, यासाठी उद्युक्त करताना दिसत आहे. तसेच ईव्हीएम यंत्रासह आरोपी नाचतानाही दिसत आहे. यावेळी तो त्याच्या सहकाऱ्याला सांगतो की, हा पूर्ण परिसर आपल्याच नियंत्रणात आहे. याठिकाणी भाजपाचे विद्यमान खासदार जसवंतसिंह भाभोर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

महिसागर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक जयदीपसिंह जडेजा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, दोन्ही आरोपींना आम्ही अटक केली आहे. लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'आम्ही विजय भाभोर आणि त्याचा सहकारी मनोज मगन (वय ३८) यांना बोगस मतदान केल्याप्रकरणी अटक केली आहे. दोघेही भाजपाचे कार्यकर्ते आहेत. तर आरोपी विजय भाभोरचे वडील रमेश भाभोर हे संतरामपूर तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष होते', अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.