विनंती बदल्यांआधीच वशिल्याच्या तट्टूंचे 'सेलिब्रेशन'!
गॅझेटनंतर अनेकांचे देव पाण्यात
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील एका 'खात्या'च्या वार्षिक सर्वसाधारण बदल्या होऊन आठवड्याचा कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही विनंती बदल्यांबाबत साहेबांनी निर्णय न घेतल्याने अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. दुसरीकडे मात्र काही वशिल्याच्या तट्टूंनी विनंती बदल्यांमध्ये आपली बदली होणारच असे गृहीत धरून 'सेलिब्रेशन'ही केले. मात्र अजूनही बदल्यांचे आदेश न निघाल्याने कलेक्शनच्या अपेक्षेत असणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे यंदा सर्वसाधारण बदल्यांना जूनअखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य पातळीवर उप, सहायक असणाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. नंतर काही वरीष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. यथावकाश जिल्ह्याच्या प्रमुख साहेबांनाही वार्षिक सर्वसाधारण बदल्यांची यादीही जाहीर केली. या यादीतही काहींना अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आधीच विनंती बदलीसाठी अर्ज दिला आहे. शिवाय काहींनी कलेक्शनच्या अपेक्षेने काही शाखांमध्ये बदलीसाठीही विनंती अर्ज केले आहेत. यात काही वशिल्याचे तट्टूही आहेत. मात्र हे सगळेच सध्या तरी गॅसवर असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या झाल्यानंतर आता आपली बदली होणार या अविर्भावात असणाऱ्यांनी चक्क जिल्ह्याबाहेर जाऊन 'सेलिब्रेशन'ही केल्याच्या चर्चाना उत आला आहे. तर अजूनही साहेबांनी विनंती बदल्यांची यादी जाहीर न केल्याने संबंधितांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता तर आषाढी वारीही संपल्याने ही यादी प्रसिद्ध होईल या आशेवर संबंधित आहेत. मात्र साहेब अजूनही विनंती बदल्या करण्याच्या 'मूड'मध्ये नसल्याचीही चर्चा आहे.
वशिल्याच्या तट्टूंनी आता पांडुरंगाला साकडे तर घातलेच आहे, देवही पाण्यात घातले आहेत. शिवाय आपले राजकीय 'गॉडफादर' असलेल्यांच्या मागे त्यांनी आता बदलीसाठी पुन्हा तगादा लावल्याचे चित्र आहे. एकंदरीत विनंती बदल्या अद्यापही न झाल्याने 'खात्या'त अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.