Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? रवी राणांचा खळबळजनक दावा

भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? 
रवी राणांचा खळबळजनक दावा



अमरावती : खरा पंचनामा

महायुतीत सारे काही आलबेल नाही असे एकंदरीत राजकीय चित्र दिसत आहे. भाजपा, शिवसेनेचे नेते उघडपणे अजित पवार गटाला टार्गेट करत आहेत. लोकसभेला अजित पवारांना सोबत घेतल्यानेच भाजपला फटका बसल्याचे आरोपही झालेले आहेत. अशातच विधानसभेला अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. रोहित पवार याचे दावे करत असतानाच महायुतीचा भाग असलेल्या रवी राणा यांनी देखील तसेच संकेत देणारे वक्तव्य केले आहे.

अजित पवार गट तिसऱ्या आघाडीतून किंवा वेगळे लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा दिल्लीतूनच आदेश आला आहे, असाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. भाजपला अजित पवारांना सोबतघेऊन लढल्याचा फटका बसायला नको म्हणून ही खेळी केली जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. आता राणांनी बडनेरा मतदारसंघामध्ये आपली महायुतीमधून उमेदवारी जाहीर करताना मोठे वक्तव्य केले आहे.

ज्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहेत त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवल्याने पक्षाचे मोठे नुकसान होते. भाजपने ज्या पण 25 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा जो प्रस्ताव दिला आहे तो अजित पवारांनी सुद्धा स्वीकारायला हवा. अजित पवार यांच्या उमेदवारांमध्ये जेवढा दम आहे तेवढे उमेदवार त्यांनी निवडणुकीमध्ये उतरवावेत. भाजपचे जे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील. दमदार उमेदवाराला थांबवणे म्हणजे महायुतीचे नुकसान आहे, असे राणा म्हणाले.

भाजपने ज्या पंचवीस जागा मागितल्या आहेत त्यामध्ये अमरावती शहर मतदारसंघही आहे. बडनेरा मतदारसंघामध्ये महायुतीचा मी उमेदवार आहे. मला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दिली आहे. मी युवा स्वाभिमान पक्षाकडून लढणार असून माझे चिन्ह पाना आहे. माझ्या पक्षासाठी मी महायुतीत पाच ते सहा जागा मागितल्या आहेत, असेही राणा म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.