गणपती विसर्जन मिरवणुकीत जीव तोडून डान्स केल्यानंतर पोलिस हवालदाराचा मृत्यू
अहमदनगर : खरा पंचनामा
पोलीस ठाण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारी तूफान डान्स केल्यानंतर सायंकाळी हार्ट अटॅकमुळे 36 वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी अहमदनगर शहरात घडली. घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे (वय ३६) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते सध्या मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी त्यांना बंदोबस्तासाठी जायचे होते.
नगर शहरातील पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारीही गणेशोत्सव साजरा करतात. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी पोलिसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यासाठी थाटामाटात मिरवणूकही काढली जाते. कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी अशीच मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामध्ये पोलिस कर्मचारी मोरे आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत पांढरा कुर्ता घालून, भगवा फेटा बांधून सहभागी झाले होते.
हिंदी मराठी चित्रपटातील गाणी स्पीकरवर वाजविली जात होती. त्यावर पोलीस बेधुंद होऊन नाचत होते. त्यातील मोरे यांचा डान्स लक्षवेधक ठरला. त्यांच्या डान्सचे सर्वांनी कौतुक देखील केले. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी गेले. तेथे सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.