Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस दलात पुन्हा बदल्यांचे वारे ! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस-निवडणूक आयोगाची बैठक

पोलीस दलात पुन्हा बदल्यांचे वारे ! 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस-निवडणूक आयोगाची बैठक



मुंबई : खरा पंचनामा

राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यावर येऊन ठेपली असून, येत्या आठवडा-दोन आठवड्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली असून, यात आचारसंहितेचे पालन करीत रखडलेल्या बदल्या तत्काळ करण्याचे आदेश पोलीस दलास देण्यात आले आहेत. त्यानुसार, येत्या आठवड्यात पोलीस दलात पुन्हा बदल्याचे आदेश जारी होतील तर, इच्छितस्थळी बदलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या मुंबई 'वाऱ्या' सुरू आहेत.

निवडणूक आयोगाने मुंबईमध्ये शनिवारी (ता.२८) बैठक घेत, पोलिस दलात एकाच ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलीस दलास दिले आहेत. या बैठकीला पोलीस महासंचालकांसह राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीवेळी देखील अशारितीने बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही पोलीस दलात तीन वर्षे कार्यकाल झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. असे असले तरी काही ठिकाणी अद्यापही काही अधिकारी ठाण मांडून आहेत.

मात्र आता निवडणूक आयोगानेच आदेश दिल्याने अशा अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे बदली दूरवर होऊ नये, यासाठी नजिकच्या ठिकाणी बदलीसाठी काही अधिकारी मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांच्या माध्यमातून बदली इच्छितस्थळी करण्यासाठी 'जोर' लावत आहेत.

गेल्या महिना-दीड महिन्यात पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक ते सहायक आयुक्त पदावरील अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील काही अधिकारी रूजू झाले तर काही अजून नवीन आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. काही अधिकाऱ्यांना संबंधित मंत्र्यांकडून 'हिरवा झेंडा' दाखविलेला आहे परंतु अद्यापही आदेश जारी नसल्याने अधिकाऱ्यांवर बदलीची तलवार लटकलेली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.