ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सीमेवर ड्युटी!
राज्य उत्पादन शुल्कचा अजब कारभार
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. रविवारी आणि मंगळवारी अनंत चतुर्थीला सांगलीसह मिरजेत मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुकांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात तीन दिवस ड्राय डे घोषित करण्यात येतो. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते. त्यावर कारवाई करणाऱ्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ड्युटी गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या सिंधुदुर्ग येथील तपासणी नाक्यावर लावण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या या अजब कारभाराची जोरदार चर्चा होत आहे.
उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर येथील विभागीय उपायुक्त कार्यालयाकडून सीमेवरील तपासणी नाक्यांवर ड्युटी लावली जाते. दि. २३ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या काळासाठी उपायुक्त कार्यालयामार्फत ड्युटी लावण्यात आली आहे. ऐन उत्सवाच्या काळात सांगली जिल्ह्यातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना सीमा तपासणी नाक्यावर ड्युटी लावण्यात आली आहे. अनंत चतुर्थीला मिरजेत मोठ्या प्रमाणात मिरवणुका असतानाच तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या या नाक्यांवर ड्युटी लावण्यात आली आहे.
विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात. या काळात मद्याचा खपही मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. खप वाढत असल्याने गोवा मेड तसेच बनावट दारूची आयात कोल्हापूर विभागात मोठ्या प्रमाणात होत असते. ड्राय डेच्या दिवशी त्याची जोरात विक्री केली जाते. त्याच्यावर कारवाईचे अधिकार उत्पादन शुल्क विभागाला आहेत. गोवा आणि बनावट दारूच्या अवैध विक्रीमुळे मिरजेत गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात जातीय दंगल झाली होती. त्यामुळे उत्सव काळात सांगली जिल्ह्यात आणि विसर्जनावेळी मिरजेत उत्पादन शुल्कचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक असतानाही त्यांना तपासणी नाक्यावर ड्युटी लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.