एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक करणार बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा तपास !
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई पोलिसातील वरिष्ठ पदावरील अधिकारी दया नायक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण आहे माजी मंत्री आणि एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं. मुंबई क्राइम ब्रान्चकडून बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्र पोलीस एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले दया नायक यांचं बालपण आर्थिक चणचणीत गेलं. ते मूळतः कर्नाटकातील राहणारे आहेत. त्यांच्या घराची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे कन्नड शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते 1979 मध्ये मुंबईत आले. येथे त्यांना हॉटेलमध्ये टेबल स्वच्छ करण्याचं काम मिळालं. हॉटेल मालकाने त्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत केली. यादरम्यान त्यांनी तीन हजार रुपयांची प्लंबरची नोकरीदेखील केली होती.
दया नायक 1995 मध्ये पोलीस भरतीत पोलीस उप निरीक्षक म्हणून रुजू झाले. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काऊंटर पथकात होते.
पोलीस दलात रुजू झाल्यानंतर दया नायक यांची पहिली पोस्टिंग जुहू पोलीस ठाण्यात झाली होती. 31 डिसेंबरच्या रात्री दया नायक ड्युटीवर होते. यादरम्यान त्यांना छोटा राजन गँगच्या दोन गटांची माहिती मिळाली. दया जेव्हा त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी दया यांच्यावर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल दया यांनी दोन्ही गँगस्टरांवर गोळ्या झाडल्या. यात दोघांचा मृत्यू झाला. हा दया यांचा पहिला एन्काऊंटर होता. यानंतर दया घाबरले होते. विभाग त्यांना निलंबित करेल अशी त्यांना भीती होती. आतापर्यंत दया नायक यांनी 87 हून जास्त एन्काऊंटर केले आहेत. दया यांनी 1999 ते 2003 दरम्यान दाऊदचा भाऊ छोटा राजन याच्या गँगलाही संपवलं होतं.
दया नायक यांच्या कार्यकाळात त्यांच्या नावाभोवती अनेक वाद घोंगावत होते. 2003 मध्ये एका पत्रकाराने त्यांच्यावर दाऊद गँगकडून पैसे घेऊन शाळा सुरू केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात कोर्टाच्या निर्देशानुसार त्यांच्यावर मकोकाअंतर्गत प्रकरण दाखल केलं होतं. या प्रकरणात 2010 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली होती.
बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती. पुढे ACB ने कोणतेही पुरावे न दिल्याने नायक यांना क्लिन चीट मिळाली.
2012 मध्ये नायक यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांची नियुक्ती मुंबईत करण्यात आली. त्यानंतर त्यांची बदली नागपूर येथे करण्यात आली. त्या ठिकाणी रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पुढे 2016 मध्ये त्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेत मुंबईत त्यांची पोस्टिंग करण्यात आली. विशेष म्हणजे नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारलेला 'अब तक 56' हा चित्रपट दया नायक यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जातं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.