दुकानातून खाद्यपदार्थ चोरणाऱ्या टोळीला अटक
३.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त, इस्लामपूर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर येथील नमकीन व्यापाऱ्याच्या दुकानातून खाद्यपदार्थ चोरणाऱ्या तिघांच्या टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून छोटा हत्तीसह खाद्यपदार्थ मिळून ३.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
अरूण लक्ष्मण गौडा (वय २१), जितू खुबाराम पटेल (वय १९), हनुमान मंगलराम पटेल (वय २७, सर्व रा. इंग्रुळ, ता. शिराळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक हारूगडे यांनी इस्लामपूर परिसरात गस्त वाढवली. निरीक्षक हारूगडे आणि त्यांचे पथक पेठनाका ते वाघवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी इस्लामपूर येथील नमकीन व्यापारी संस्कार अग्रवाल यांच्या दुकानातून चोरलेले खाद्यपदार्थ घेऊन चोरटे छोटा हत्ती (एमएच १० सीआर ३२९२) मधून जात असल्याची माहिती त्यांना खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला होता.
मिळालेल्या माहितीप्रमाणे छोटा हत्ती वाहन तेथे आल्यानंतर पोलिसांनी ते अडवले. त्याची तपासणी केल्यावर त्यामध्ये बारीक शेवची पोती, बुंदी, चिली-मिली, वेफर्स, चाॅकलेट आढळून आले. त्याबाबत वाहनातील तिघांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अग्रवाल यांच्या दुकानातून तो माल चोरल्याची कबुली दिली. वाहनासह मुद्देमाल जप्त करून तिघांनाही अटक करण्यात आली.
इस्लामपूर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक किरण दिडवाघ, सतीश खोत, अमोल सावंत, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, दीपक घस्ते, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.