सांगलीत दहा किलो गांजा पकडला, कोथळीच्या तरुणाला अटक
साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील आकाशवाणी ते काळीवाट जाणाऱ्या रस्त्यावर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तब्बल दहा किलो गांजा जप्त केला. संशयित हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी येथील आहे. संशयिताकडून ३ लाख ६० हजार किंमतीचा गांजा आणि दुचाकी असा ४ लाख ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगली शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
अभिनंदन राजगोंडा पाटील (वय ३२, रा. कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. मध्यरात्री ही कारवाई केली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्तीमध्ये वाढ केली आहे. सांगली शहर पोलिसांच्या पथकास रात्री १२ च्या दरम्यान आकाशवाणी ते काळीवाट जाणाऱ्या सुभाषनगर परिसरात एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकातील संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला होता. सुभाषनगर गल्ली क्रमांक १ मध्ये एकजण दुचाकीवरुन येवून थांबला होता. पोलिसांना संशय आल्याने संशयितास ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १० किलो २८६ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलिस चौकशीत त्याने गांजाची शहरात विक्री करण्यासाठी जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गांजासह त्याच्याकडील दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरिक्षक महादेव पोवार, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदिप पाटील, सचिन शिंदे, गणेश कोळेकर, प्रशांत पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.