योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' नाऱ्याला पंकजा मुंडेंचा विरोध
मुंबई : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दिलेला 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा भाजपमधील नेत्यांनाच पचनी पडलेला नाही. त्यावर या नेत्यांकडून आता उघडपणे नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी अशा नारेबाजीची गरज नसल्याचे ठाम मत मांडले आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही आधीच या नाऱ्याचा विरोध केला आहे. आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही विरोधी सूर आळवला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केले. आम्ही त्या पक्षाचे आहोत, म्हणून या नाऱ्याचे समर्थन करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांनी विकास हाच प्रमुख असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, येथील प्रत्येक व्यक्तीला आपले समजणे, हे नेत्याचे काम आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारेच मुद्दे येता कामा नयेत. योगी आदित्यनाथ यांनी हे उत्तर प्रदेशसंदर्भात म्हटले होते. तिथे वेगळ्या प्रकारची राजकीय स्थिती आहे. त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात-धर्म न पाहता सर्वांना रेशन, घर, सिलेंडर दिले आहेत, असे सांगताना पंकजा यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानावरून पंतप्रधान मोदींच्या योजनांकडे लक्ष देण्याबाबचे सूचक विधानही केले. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या आधी अजित पवार यांनीही बटेंगे तो कटेंगे वरून नाराजी व्यक्त केली होती. तर महाविकास आघाडीने योगींवर निशाणा साधला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.