'तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा!'
निवडणुकीत शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज बुधवारी (दि. १३) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांचा फोटो आणि व्हिडिओ वापरू नका, असे निर्देश दिले.
तुम्हाला तुमची एक वेगळी ओळख म्हणून निवडणूक लढवावी लागेल. यामुळे निवडणूक प्रचार साहित्यात शरद पवारांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नका, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, जुना व्हिडिओ असो वा नसो. शरद पवार यांच्याशी तुमचे वैचारिक मतभेद आहे आणि तुम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहात. मग तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शरद पवार यांची व्हिडीओ क्लिप अथवा त्यांचा फोटो वापरू नका. यासाठी तुमच्या पदाधिकाऱ्यांना परिपत्रक जारी करा. एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही तुमची ओळख बनवू शकता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्याची मागणी करत शरद पवार यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. याआधीच्या सुनावणीत, न्यायालयाने अजित पवार गटाला चिन्हाविषयी निर्देश दिले होते. न्यायालयाने स्पष्ट सांगितले होते की, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ठळक जाहिराती द्या. यामध्ये घड्याळ चिन्हासह हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, याचा उल्लेख करावा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करा.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.