Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"कोल्हापूर जिल्ह्याचा महा एक्झिट पोल" महाआघाडीला ५ ते ७, महायुतीला २ ते ३ जागा मिळणार विद्यमान अनेक आमदारांचा पत्ता होणार कट

"कोल्हापूर जिल्ह्याचा महा एक्झिट पोल"
महाआघाडीला ५ ते ७, महायुतीला २ ते ३ जागा मिळणार
विद्यमान अनेक आमदारांचा पत्ता होणार कट



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी चांगलीच वधारल्याचे दिसून आले. वाढलेला मतदानाचा टक्का, जातीचे राजकारण, लक्ष्मी दर्शन यासह विविध कारणांनी कोल्हापूर जिल्ह्यातील यंदाची निवडणूक चुरशीची झाल्याचे दिसून आले. मतदारांचा कल लक्षात घेऊन खरा पंचनामाच्या टीमने कोल्हापूर जिल्ह्यातील एक्झिट पोल केला. यामध्ये महाविकास आघाडीला ५ ते ७ तर महायुतीला २ ते ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. यंदाही भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात खाते खोलता येणार नाही अशीच चिन्हे आहेत. सतेज पाटील यांची रणनीती आणि कॉंग्रेसला सीमेपलीकडील पक्षाच्या नेत्यांकडून मिळालेला बुस्टर डोस यामुळे यंदाही कोल्हापूर जिल्ह्यात कमळ फुलण्याची शक्यता कमीच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आघाडीचे ऋतुराज पाटील आणि युतीचे अमल महाडिक यांच्या चुरशीची लढाई पहायला मिळाली. लाडकी बहीण योजनेचा फायदा होण्याची चिन्हे असतानाच खासदार धनंजय महाडिक यांच्या एका वक्तव्याने या मतदारसंघातील गणितेच बिघडवून टाकली. त्यामुळे या मतदारसंघात आघाडीचे ऋतुराज पाटील निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अर्ज माघारीवेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आघाडीने अपक्ष उमेदवार राजू लाटकर यांना पाठींबा दिला. या मतदारसंघात शिंदे गटाचे राजेश क्षिरसागर रिंगणात असून त्यांचा मारहाणीचा एक जुना व्हिडिओ विरोधकांनी सोशल मिडियावर व्हायरल केला. शिवाय कॅंग्रेसचे जिल्ह्याचे चाणक्य सतेज पाटील यांच्या रणनीतीमुळे लाटकर यांचा निसटता विजय होईल असा अंदाज आहे. 

कागल मतदारसंघात राज्यातील हाय व्होल्टेज लढत होत असून शरद पवार यांनी थेट कागलमध्ये मुश्रीफांना पाडा असा थेट संदेश दिला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत यंदा कागलकर समरजीत घाटगे यांच्या पाठीशी उभे राहतील असा अंदाज आहे. चंदगड मतदारसंघात नंदाताई बाभुळकर यांचाही निसटता विजय होईल असे तेथील राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. राधानगरीमध्ये मात्र आघाडीला धूळ चारत युतीचे प्रकाश आबिटकर यांचा विजय सोपा मानला जात आहे.  

करवीर मतदारसंघात युतीच्या चंद्रदीप नरकेंनी आघाडीच्या राहुल पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. तरीही पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर असलेल्या सहानुभुतीच्या लाटेवर राहुल पाटील येथून विजयी होण्याची शक्यता आहे. पन्हाळा-शाहुवाडी मतदारसंघात यंदा धक्कादायक निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेला थोडक्यात पराभव स्विकारावा लागलेल्या सत्यजित पाटील यांनी विधानसभेला जोरदार तयारी केली होती. त्यांची लढत विनय कोरे यांच्याशी होत आहे. या चुरशीच्या लढतीत आघाडीचे सत्यजित पाटील बाजी मारतील असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. 

इचलकरंजी मतदारसंघात युतीचे राहुल आवाडे आणि आघाडीचे मदन कारंडे यांच्यात लढत होत आहे. आवाडेंचा पारंपरिक मतदारसंघ असला तरी विधानसभेच्या रिंगणात तसे नवखे असलेल्या आघाडीच्या कारंडे यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. सुरुवातील एकतर्फी वाटणारी ही लढत अखेरच्या काळात चुरशीची बनली. त्यानंतर झालेल्या काही जातीय समीकरणांमुळे आवाडेंसमोरील आव्हान वाढल्याचे दिसून आले. या मतदारसंघात आवाडे आणि कारंडे निवडून येण्याची शक्यता सारखीच असल्याचे दिसून येते. तरीही जातीय समीकरणे व्यवस्थित बसली तर कारंडे यांचा विजय निश्चित आहे. 

हातकणंगले मतदारसंघात युतीचे अशोक माने आणि आघाडीचे राजू आवळे यांच्या थेट लढत होत असली तरी तिसऱ्या आघाडीचे सुजित मिणचेकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती. माने यांना वारणेची ताकद मिळूनही आवळे यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते. शिरोळ मतदारसंघात युती पुरस्कृत अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आघाडीचे गणपतराव पाटील यांच्या सरळ लढत असल्याचे सुरूवातीचे चित्र होते. मात्र राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेचे ऐनवेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर ही लढत तिरंगी झाली. या मतदारसंघातही मोठी चुरस दिसून आली. मात्र मतदानादिवशी गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील यांच्यातच खरी लढत होत असल्याचे दिसून आले. या मतदारसंघात सतेज पाटील यांच्या रणनीतीनुसार जातीय समीकरणे झाली तर आघाडीचे गणपतराव पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.