पन्नास हजारांची लाच घेणारी महिला पोलिस हवालदार निलंबित
सांगली : खरा पंचनामा
तक्रार अर्जाच्या चौकशीत मदत करून गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात सापडलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील महिला पोलिस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर- भडेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या गैरवर्तनप्रकरणी सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी काढले आहेत.
विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीबाबत एक तक्रारी अर्ज दाखल झाला होता. त्याची चौकशी कोंगनोळीकर-भडेकर करत होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने संशयितावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच यामध्ये मदत करण्यासाठी कोंगनोळीकर यांनी त्यांच्याकडे पन्नास हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर कोंगनोळीकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी सांगलीवाडी येथील एका महाविद्यालयाजवळ त्यांना पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, सीमा माने, वीणा जाधव, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने कोंगनोळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी गैरवर्तन केल्याने त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश बुधवारी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी काढले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.