सेवेतून बडतर्फीची नोटीस मिळताच पोलिसाची आत्महत्या
नागपूर : खरा पंचनामा
सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस मिळाल्याने तणावात असलेल्या पोलिसाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना कळमनाच्या स्ट्राँग रूम परिसरात घडली. या घटनेने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. रामचंद्र नानाजी रोहणकर (वय 54, रा. अंजनी सोसायटी, पिपळा फाटा) असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहणकर शहर पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांची तैनाती पोलिस मुख्यालयात होती. गतवर्षी एप्रिल महिन्यात रोहणकर आणि त्यांचा सहकारी हवालदार भूषण बेलखोडे हे दोघेही पिपळा फाटाजवळील निमजे सावजी भोजनालयात जेवण करण्यासाठी गेले होते. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांचा भोजनालयाच्या मालकाशी वाद झाला होता. या दरम्यान त्यांनी मालकाला शिविगाळ करून मारहाण केली होती. ही संपूर्ण घटना भोजनालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
हॉटेलच्या कर्मचाऱ्याने दोघांचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. घटनेच्या वेळी आसपासचे नागरिकही मोठ्या संख्येने तेथे जमले होते. नागरिकांनी रोहणकर आणि बेलखोडेला पकडून चांगला चोप दिला.
काही दिवसांपूर्वीच दोघेही परत सेवेत रुजू झाले. त्यांची ड्यूटी कळमनाच्या ईव्हीएम स्ट्रॉग रूममध्ये लावण्यात आली होती. दोघांच्याही कृत्याने नागरिकांच्या मनात पोलिस विभागाची प्रतीमा मलीन झाली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच दोघांनाही सेवेतून बडतर्फ का करू नये, अशी नोटीस बजावून उत्तर मागण्यात आले होते. नोटीस मिळाल्याने रोहणकर यांना नोकरी जाण्याची भीती होती. त्यामुळे ते तणावात होते.
मंगळवारी सायंकाळी त्यांनी ड्युटीवर असताना स्ट्राँग रूममध्येच विष प्राशन केले. प्रकृती खालावल्याने त्यांनी फोन करून कुटुंबीय आणि नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांसह कळमना पोलिस घटनास्थळी पोहोचले. रोहणकर यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.