आता पुराव्याअभावी गुन्हेगार सुटणार नाहीत !
प्रत्येक भागांत असणार मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, महाराष्ट्र पहिले राज्य
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईल फॉरन्सिक व्हॅन्सचे लोकार्पण केले. अशा व्हॅन असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे कोणत्याही गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणे किंवा पुराव्यांशी छेडछाड करणे थांबणार असून पुराव्यांअभावी गुन्हेगार सुटणार नाहीत तसेच गुन्हे उघडकीस येणे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणे यात गुणात्मक बदल होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशामध्ये केंद्र सरकारने जो भारतीय साक्ष्य अधिनियम सुरु केला आहे, या कायद्यानुसार साक्ष्य गोळा करणे, त्याची योग्य प्रकारे व्यवस्था करणे, स्टोरेज करणे याचे नवीन नियम केले आहेत, या नियमाअर्तंगत महाराष्ट्र असे राज्य आहे ज्याला अनुकूल अशा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स निर्माण केल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असणार आहे. यात एक सायंटिफिक अॅनालिस्ट आणि एक केमिकल अॅनालिस्ट असतील, ज्यांना फॉरेन्सिक तज्ज्ञांचा दर्जा आहे.
गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन ते पहिल्यांदा घटनास्थावर ताबा मिळवतील, त्यानंतर ते तेथील पुरावे गोळा करतील. यामध्ये रक्ताचे नुमने, नार्कोटिक्सचे नमुने, एखाद्या स्फोटाचे नुमने, किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे असतील या प्रत्येकाचे जागेवर टेस्टिंग करण्याचे किट आहे. यामुळे पुराव्याअभावी गुन्हेगार सुटणार नाहीत. जे अनेक खटल्यांमध्ये घडते.
या किटच्या माध्यमातून 100 टक्के प्राथमिक आणि अंतिम देखील निष्कर्ष काढता येईल. यासोबत जे जमा झालेले पुरावे आहेत, ते साठवण्यासाठी ब्लॉकचेन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अनेक वेळा आपण पाहतो की, कोर्टातूनही आरोपी सुटतात, कारण पुरावे नष्ट झालेले असतात किंवा ते टेंम्पर केलेल असतात. पण ब्लॉकचेन पद्धतीमुळे पुरावा कोणालाही टेम्पर करता येणार नाही. त्यामुळे अतिशय सबळ आणि वैज्ञानिक पुरावा आपल्याकडे राहिल.
या सगळ्या व्हॅन्समध्ये सीसीटीव्ही आणि फ्रिजदेखील आहे. यामुळे पुरावा किंवा इक्विपमेंट किंवा तपासणीचे केमिकल विशिष्ट तापमानाला ठेवता येतील. तसेच हे सगळं योग्य प्रकारे सील होत आहे की नाही या त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहता येईल. त्यामुळे आरोपींना कुठेही वाव मिळणार नाही, एखाद्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात वीर्य नुमने असतील किंवा रक्ताचे नमुने किंवा एखादे डीएनए करता सायंटिफिक कलेक्शन असेल, असं कोणतेही पुरावे या माध्यमातून गोळा करता येतील. यामुळे गुन्हे उघडकीस येणे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणे यात गुणात्मक बदल होईल. असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही 21 व्हॅन तयार केल्या आहेत नंतर आम्ही अशा 256 व्हॅन्स तयार करणार आहोत. सगळ्या भागांत या फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध असतील. यामुळे चांगलाच फायदा होणार आहे यामुळे गुन्हे सिद्ध होण्याचा दर देखील वाढेल आणि गुन्हेगारांच्या मनात भीती देखील निर्माण करता येईल असे फडणवीस म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.