Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात बसस्थानकाजवळ पोलिस अधिकाऱ्यास मारहाण

कोल्हापुरात बसस्थानकाजवळ पोलिस अधिकाऱ्यास मारहाण



कोल्हापूर : खरा पंचनामा 

मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीचे काम आटोपून मध्यवर्ती बसस्थानकात उतरल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे निघालेले सहायक पोलिस निरीक्षक विशाल दशरथ मुळे यांना खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटनी बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. २८) रात्री साडेअकराच्या सुमारास महालक्ष्मी चेंबरसमोर घडला. मुळे यांच्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, यातील दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या दोघांना पोलिसांनी अटक केली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे हे उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी मुंबईला गेले होते. मंगळवारी रात्री ते एसटीने मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचले. शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे जाताना महालक्ष्मी चेंबरसमोर खासगी ट्रॅव्हल्सचा एजंट अकिब पठाण हा धावत आला.

पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स लागली आहे, असे म्हणत तो हाताला धरून ओढू लागला. मुळे यांनी त्याला पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. तरीही तो बसपर्यंत ओढून घेऊन गेला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मुळे हे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मोबाइलवरून घडलेल्या प्रकाराची माहिती देत असताना तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली.

सहायक पोलिस निरीक्षक मुळे हे साध्या वेशात होते. आपण पोलिस अधिकारी असल्याचे ते ओरडून सांगत होते. पण, पोलिस आहेस ना? तुला बघून घेतो, असे म्हणत तिघांनी त्यांना मारहाण केली. या घटनेने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

या गुन्ह्यातील अकिब पठाण, दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, यातील पठाण वगळता इतर दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू करताच बुधवारी सकाळी महालक्ष्मी चेंबरसमोर ट्रॅव्हल्स चालक आणि एजंटची गर्दी जमली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.