माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता!
एसीबीने केलेल्या गुप्त चौकशीत माहिती समोर
मुंबई : खरा पंचनामा
माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत समोर आले आहे. सांताक्रुझ येथे 22 कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅट, पुण्यात तब्बल 25 कोटीचा आलिशान व्हिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी पूर्ण केली आहे. आता उघड चौकशीसाठी परवानगी मागितली आहे. उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याची अशा प्रकारे चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू करण्यात आली होती. गुप्त चौकशीत तथ्य आढळल्यानंतर आता एसीबीच्या महासंचालकांकडे उघड चौकशीची परवानगी मागण्यात आली आहे. या परवानगीनंतर अमिताभ गुप्ता यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आल्हाट यांच्या तक्रारीनुसार, अमिताभ गुप्ता यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता आहे. पुण्यातील अॅमनोरा टाउनशिप मधील स्वीट वॉटर व्हीला प्रकल्पात त्यांचा एक आलिशान व्हीला आहे.
त्याची किंमत तब्बल 25 कोटी रुपये इतकी असल्याचा दावा आल्हाट यांनी केला आहे. याशिवाय, मुंबईतील सांताक्रुझ येथे त्यांचा 22 कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅट असल्याचेही आल्हाट यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जमविल्यामुळे अमिताभ गुप्ता यांच्या उत्पन्नाच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसीबीने केलेल्या गुप्त चौकशीत या संदर्भात काही महत्वाचे धागेदोरे सापडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आता एसीबीने उघड चौकशीसाठी परवानगी मागितली आहे.
गुप्ता यांच्या उघड चौकशीला लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशी मागणी सुधीर आल्हाट यांनी केली आहे. गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाच्या कार्यकाळात दाखल केलेले काही गुन्हे आणि दिलेले रिव्हॉल्वर परवाने यांचीही चौकशी करण्याची मागणी आल्हाट यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.