'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
शिर्डी : खरा पंचनामा
पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते. धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नवसंकल्प शिबिरातील भाषणात धनंजय मुंडे म्हणाले की, मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करत आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी आता तुमच्यावर आली आहे. फक्त बीड नाही तर अख्ख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. आम्ही शिव-शाहू-फुले यांच्या विचारांचे आहोत का? असे प्रश्न आम्हाला विचारले जातात. आपला एकमेव पक्ष आहे जो शिव-शाहू-फुलेंच्या विचाराने चालतो, असे त्यांनी म्हटले.
बीड जिल्ह्यात आमचे सरपंच देशमुख यांची निर्घण हत्या झाली. त्याचे समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी केलं त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. त्या 5-8 गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला म्हणत आहेत कोणी केला? 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे. पण, एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जातंय. आम्ही हात जोडून विनंती केली. माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्यामागे उभा राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करु शकत नाही. जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही. टीका करायचीच ठरलं तर माझ्यासारखा टीकाकार कोणी होऊ शकत नाही. आपल्याला नव संकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्यावर तेवढा विश्वास ठेवला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटेचा शपथविधी पार पडला होता. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. या घटनेवरून धनंजय मुंडे म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले, काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरु झालं, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला. याबाबत माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, एकंदर सद्यस्थिती पाहता, मी स्वतः अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दादांनी द्यावी. पुण्याचा जसा विकास झाला तसा दादांकडे उपमुख्यमंत्रिपद असल्यामुळे बीडचाही विकास होईल. बीडची आता जी परिस्थिती आहे, त्यात आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे. दादांकडे द्यायला पाहिजे. सद्यपरिस्थितीत काय निर्णय घ्यायला पाहिजे हे लक्षात घेऊन मी पक्षाला विनंती केली की जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दादांना द्यावी, असे त्यांनी म्हटले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.