महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास डीवायएसपी चोरमलेंकडे
बीड : खरा पंचनामा
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून आणि पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे आता परळीत सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या महादेव मुंडे यांच्या खुनाचे प्रकरणही समोर आले आहे. सव्वा वर्षापासून तपास न झालेल्या या खून प्रकरणाचा तपास आता अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आला आहे.
परळी तालुक्यातील भोपळा येथील रहिवासी व व्यवसायानिमित्त परळी शहरात वास्तव्यास असलेल्या महादेव दत्तात्रय मुंडे यांचा ता. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी तहसीलजवळ खून झाला होता. घटनेला १५ महिने लोटले तरी तपास नव्हता. या प्रकरणात विविध तपास अधिकारीही बदलले तरी घटनेचा छडा आणि आरोपींचा शोध लागला नाही. दरम्यान, संतोष देशमुख खून व पवनक्की खंडणी प्रकरणामुळे या प्रकरणाला वाचा फुटली.
भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले. खुनाच्या घटनेच्या कालावधीत वाल्मीक कराड याची मुले श्री व सुशील कराड यांनी त्यांच्या घरातून १५० फोन कॉल्स विविध पोलिसांना केल्याचा दावा त्यांनी सायबर तज्ज्ञ अतुल दुबे यांच्या हवाल्याने केला. तसेच, तपास अधिकारी बदलण्याची मागणीही त्यांनी केली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनीही या तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, आता या खून प्रकरणाचा तपास अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांना देण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तपास करण्याचे आदेश श्री. चोरमले यांना दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.