खाजगी प्रवासी वाहतूक कंपन्या सरकारी निगराणीत येणार
मुंबई : खरा पंचनामा
ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.
राज्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनात आणण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव, संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतुक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, खाजगी प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांसंदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या धोरणाचा विचार करून, या कंपन्याना एकाच परिवहन नियमा अंतर्गत एकत्रित आणणे गरजेचे आहे. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे. सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअतर्गत चारचाकी, बाईक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे. बाईक चालविण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावे, जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात अशाही सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या. खाजगी वाहतूक व्यवस्था, सुस्थितीत असलेली वाहने, प्रवाशांची सुरक्षा, हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा, झीरो कमीशन सेवा इत्यादी बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांनी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.