Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसास्थळे बनणार..."

"शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसास्थळे बनणार..."



शिवनेरी : खरा पंचनामा 

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असलेले किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक आणि विविध व्यवस्थापनाचे गुरु होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून त्यांना आदर्श राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण स्मरण करतो.

स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत काळजी घेण्यात येत आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले पॅरिस येथील नामांकनासाठी निवडण्यात आले आहेत. हे गडकिल्ले जलसंवर्धन आणि पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथे पुढील आठवड्यात होणाऱ्या महासभेत सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होऊन जगातील लोक पर्यटनासाठी या गड किल्ल्यावर येतील," अशा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुगल साम्राज्यामध्ये विविध राजे-राजवाडे यांनी मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरु होते. माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करुन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन मावळ्यांची फौज तयार केली; यामाध्यमातून देव, देश आणि धर्माची लढाई सुरु करुन स्वराज्य स्थापनेतून खऱ्या अर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

पुढील ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव आपण दिमाखात साजरा करणार आहोत. छत्रपतींच्या किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती, तेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरीता आम्ही येथे येतो. राज्य सरकारमार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असे देखील फडणवीस म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.