दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिसणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा AI चित्र प्रवास
बार्शीच्या संजय कांबळे ना विशेष निमंत्रण!
बार्शी : खरा पंचनामा
येथील संजय श्रीधर कांबळे यांना दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण दिले गेले आहे. दिनांक 21, 22, 23 फेब्रुवारी या काळामध्ये दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन होत आहे.
या संमेलनात तालकटोरा स्टेडियम मध्ये अण्णाभाऊ साठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच या साहित्य नगरीला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नामकरण करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये संजय श्रीधर कांबळे यांनी निर्माण केलेल्या AI तंत्रज्ञानाने निर्मित साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा चित्र प्रवास घडवणारी छायाचित्रे प्रदर्शनात मांडली जाणार आहेत .
गतवर्षी पुणे येथे सारसबाग परिसरामध्ये झालेल्या या चित्र प्रदर्शनाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री महोदयांनी उपस्थिती लावून चित्रप्रदर्शनाचा आनंद घेतला होता .
तसेच पुणे शहर व परिसरातील लाखो अण्णाभाऊ साठे प्रेमींनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला होता. यावर्षी महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चित्र प्रदर्शनातील अनेक फोटो महाराष्ट्रभर प्रदर्शित झाल्याचे पाहायला मिळत होते.
हे प्रदर्शन दिल्लीमध्ये व्हावे यासाठी सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी संजय श्रीधर कांबळे यांना विशेष निमंत्रण दिले आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील बालपणापासून ते अण्णाभाऊ साठेंचा रशिया प्रवासापर्यंतची काही ठळक वैशिष्ट्ये असणारी छायाचित्रे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
हे एक विशेष प्रदर्शन म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. या चित्रांचा समावेश असणारे एक पुस्तकही नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या भेटीचा कार्यक्रम दिल्लीमध्ये मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.