देवेंद्र फडणवीस यांच्या चाळणीत 16 अधिकारी सापडले फिक्सर; 109 जण पास
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनासाठी कमालीचे आग्रही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही फडणवीस यांना त्याबाबतचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसारच फडणवीस काम करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यातूनच पीएस आणि ओसडी नेमण्यासाठी सर्व मंत्र्यांनी पाठवलेल्या 125 अधिकाऱ्यांच्या नावांपैकी तब्बल 16 अधिकाऱ्यांच्या नावावर त्यांनी फुली मारली आहे. हे अधिकारी फिक्सर असल्याचे फडणवीस यांना आढळून आले आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना "आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्रीच ठरवतात. आमच्या हातात काही राहिलेले नाही, अशी हतबलता बोलून दाखविली होती. त्यावर "कोकाटे यांना माहिती नसेल की पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो. मंत्र्यांनी फक्त नावे पाठवायची असतात", अशा शेलक्या शब्दात फडणवीस यांनी कोकाटे यांना झापले.
फडणवीस पुढे म्हणाले, मी मंत्रिमंडळ बैठकीतच सर्व मंत्र्यांना सांगितले होते की पीएस आणि ओएसडी म्हणून तुम्हाला जे अधिकारी हवे आहेत, त्यांची नावे पाठवा. पण फिक्सर म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्या नावांना मान्यता देणार नाही. त्यानुसार माझ्याकडे 125 च्या जवळपास नावे आली आहेत. त्यातील मी 109 नावे क्लिअर केली आहेत.
फिक्सर असलेले लोक मंत्रालयात नको, म्हणून उर्वरित 16 नावांना मान्यता दिलेली नाही. कारण कोणता न कोणता आरोप त्यांच्यावर आहे. तसेच कोणती न कोणती चौकशी त्यांच्यावर सुरू आहे. त्यामुळे कोणी नाराज झाले तरीही मी अशा नावांना मान्यता देणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
इतकेच नाही तर ज्या 109 नावांना मंजूरी देण्यात आली आहे ते पीए, पीएस आणि ओएसडी देखील पाच वर्षे राहतीलच असे नाही, त्यांच्याविषयी काही तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळले तर त्यांना मध्येच घरी बसावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.
हे अधिकारी कसे काम करतात? काही चुकीचे निर्णय घेतात का? पारदर्शक कारभार करतात की नाही, यावर मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असणार आहे. या सर्व अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेतला जाणार आहे. जे कुठेही काही गडबड करतील त्यांना पद मुक्त केले जाईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.