ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर चोरणाऱ्या चौघांना अटक
6.30 लाखांची वाहने जप्त, इस्लामपूर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
रेठरेबुद्रुक (ता. कराड) येथून ट्रॅक्टर आणि अंगत गाडी चोरणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ट्रॅक्टर तसेच अंगत गाडी असा 6.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
शेखर हणमंत गुजले (वय ४०, रा. बेरडमाची ता. वाळवा), वैभव रमेश पाटोळे (वय २७, रा. दहयारी ता. पलुस), वैष्णव तानाजी मदने (वय २३, रा. रेठरेधरण ता. वाळवा), अरुण दिलीप घळगे (वय २३, रा. बेरडमाची ता. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रेठरे बुद्रुक येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चोरीला गेला होता. याबाबत बुधवारी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील चोरट्याना पकडण्याच्या सूचना इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिल्या होत्या. निरीक्षक हारूगडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्याना पकडण्यासाठी शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पथक चोरट्याचा शोध घेत असताना रेठरेधरण येथे एकजण अंगत गाडीसह ट्रॅक्टर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन ट्रॅक्टर अडवला. ट्रॅक्टर चालकाकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने रेठरे बुद्रुक येथून अन्य साथीदारांच्या मदतीने ट्रॅक्टर (एमएच 09 सी 4801) चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर चारही संशयितांना अटक करून दोन्ही वाहने जप्त केली.
पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाने शिवाजी यादव, विशाल पांगे, शशिकांत शिंदे, अमोल सावंत, दिपक गस्ते, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.