ऑनलाइन खरेदीतून एका तरुणाला मिळाले जुने, फाटलेले कपडे!
कोल्हापुरातील धक्कादायक घटना
कोल्हापूर : खरा पंचनामा
पाचगावातील एका तरुणाने ई-कार्ट या वेबसाइटवरून नव्या कपड्यांची ऑनलाइनखरेदी केल्यानंतर त्यांना जुने आणि फाटलेले तीन शर्ट आले. संबंधित वेबसाइटच्या ग्राहक सेवा केंद्रावरून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे याबाबत कोणाकडे दाद मागायची? असा प्रश्न पडला आहे. बोगस वेबसाइटवरून फसवणुकीचे प्रकार वाढल्याने ऑनलाइनखरेदी बेभरवशाची बनली आहे.
सोशल मीडिया चाळताना मोबाइलच्या स्क्रीनवर ई-कार्टची जाहिरात दिसताच पाचगावातील तरुणाने तीन शर्टची ऑनलाइन खरेदी केली. कपड्यांचा दर्जा उत्तम असल्याचा उल्लेख जाहिरातीत केला होता. त्याचे फोटोही दाखवले होते. फोटोत दिसणारेच शर्ट घरपोच केले जातील, असा उल्लेख त्यात केला होता. ऑनलाइन ऑर्डर बुकिंग झाल्यानंतर आठवडाभराने रविवारी घरच्या पत्त्यावर शर्ट पोहोचतील असा मेसेज मोबाइलवर आला.
सायंकाळी डिलिव्हरी बॉयचा फोन आला. त्याने कपड्यांचे पार्सल घरी पोहोच केले. मात्र, ते फोडून पाहताच त्यातून जुने, मळकट आणि फाटलेले तीन शर्ट निघाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ई-कार्टच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण कंपनीचे सर्व नंबर बंद लागत होते. त्यांच्या वेबसाइटवर कपडे परत घेण्याची व्यवस्थाही उपलब्ध नाही. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
नामांकित कंपन्यांच्या नावे अनेक बनावट अॅप आणि वेबसाइट सुरू आहेत. सोशल मीडियात त्या स्क्रोल होत राहतात. खऱ्या आणि बोगस कंपन्यांच्या अॅपमध्ये काहीच फरक नसल्याने ते ओळखू येत नाहीत. ऑफर्स, आकर्षक जाहिराती आणि माफक किमतीमुळे खरेदी केली जाते. मात्र, पार्सल घरी पोहोचताच फसवणुकीचा प्रकार उघडकीस येतो. त्यामुळे ऑनलाइन खरेदी फसवणुकीला निमंत्रण देणारी ठरत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.