अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; पाच पोलिसांची हस्तक्षेप याचिका, हायकोर्टाने घेतली दखल
मुंबई : खरा पंचनामा
बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ज्या पाच पोलिसांवर दंडाधिकारी न्यायालयाने ठपका ठेवला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सादर केलेल्या हस्तक्षेप याचिकेची न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने दखल घेतली. तसेच या दोषी पोलिसांबाबत काय निर्णय घेणार, असा सवाल करत याबाबत राज्य सरकारला गुरुवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
अक्षय शिंदेला बनावट एन्काऊंटरमध्ये मारले. कथित एन्काऊंटरचा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास व्हावा, अशी विनंती करीत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, यांच्यासह हेडकॉन्स्टेबल अभिजित मोरे व हरिश तावडे आणि एका पोलीस ड्रायव्हर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली.
त्यावेळी दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालप्रकरणी सरकारने दोषी अधिकाऱ्यांबाबत काय निर्णय घेतला, अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यावेळी अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी हा अहवाल सीआयडीसमोर ठेवला असल्याची माहिती दिली, तर सरकारी वकील हितेन वेनेगावकर यांनी याबाबत माहिती देण्यासाठी सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब करण्याची विनंती खंडपीठाला केली. न्यायालयाने याची दखल घेत या प्रकरणावरील सुनावणी ६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली व सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.