"पोलिसांचे दुर्लक्ष नाही तर ही चूक..."
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे सबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांची पाठराखण करत या घटनेला स्वारगेट येथील सुरक्षा पुरवणारी कंपनीत जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळाला भेट देत पोलिसांकडून या घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना योगेश कदम म्हणाले, ही घटना घडल्यानंतर साधारण नऊच्या सुमारास पीडिता तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस चौकीमध्ये आली. त्यानंतर अर्धा तासाच्या आतच पोलिसांकडून ज्या कारवाई करणं आवश्यक होत्या, त्याला सुरुवात करण्यात आली होती.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अर्धा तासाच्या आत आरोपीला आयडेंटिफाय करण्यात आलं होतं. आरोपीला आयडेंटिफाय केल्यानंतर त्याच्या लोकेशननुसार पोलिसांनी त्याला ट्रॅक करण्यास सुरुवात केली आहे. सध्या परिस्थितीला आरोपीचे संभाव्य लोकेशन आपल्याला मिळालं आहे. शिवाय त्या ठिकाणी आठ टीम शोध घेण्याचं काम करत आहेत.
सध्या एक गैरसमज पसरवला जात आहे की, घटना जर परवा घडली असेल तर काल उशिरापर्यंत बातमी का आली नाही. मात्र आरोपी अलर्ट होऊ नये या दृष्टिकोनातून ही बातमी बाहेर येऊ दिली नाही. त्यामुळेच आता आरोपीचा संभाव्य लोकेशन हाती लागलं आहे. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा खुलासा कदम यांनी केला.
घटनेच्या रात्री पोलिसांनी रात्री दीड वाजता आणि पहाटे तीन वाजता अशी दोन वेळेस स्वारगेट स्थानकामध्ये गस्त घातली असल्याचे समोर आलं आहे. सीसीटीव्हीमध्ये त्या ठिकाणचे पीआय गस्त घालताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांकडून कुठलंही दुर्लक्ष झालेलं नाही.
एसटी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटी माध्यमातून एसटी स्थानकाच्या आवारात सुरक्षा पुरवण्यात येते. त्या प्रायव्हेट सिक्युरिटीकडून नक्कीच काही चुका झाल्या आहेत. एसटी आवारातील पूर्ण सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे चूक सिक्युरिटीची आहे. पोलिसांकडून कुठलंही दुर्लक्ष झालं नाही, असं कदम यांनी स्पष्ट केलं.
स्वारगेट एसटी स्थानकातील सुरक्षिततेबाबत आगार प्रमुखांनी पोलिसांना पत्र दिलं होतं. मात्र त्यावरती कोणती कारवाई झाली नाही, असं विचारलं असता कदम म्हणाले की, पत्र दिलं म्हणून एसटी आगार प्रमुखांची जबाबदारी संपत नाही. त्या परिसरात सुरक्षितेबाबत योग्य उपाय योजना करणे ही त्यांची जबाबदारीच आहे, असंही कदम म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.