नवीन जिल्हा अन् तालुका निर्मितीला ब्रेक, समिती बरखास्त !
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रात सध्या तरी कोणत्याही नवीन जिल्ह्यांची आणि तालुक्यांची निर्मिती होणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. महसूल विभागाची नव्याने पुनर्रचना करण्यासाठी माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती राज्य सरकारने बरखास्त केली आहे. त्यामुळे आता महसूल विभागाची पुनर्रचना करून राज्यात नवीन जिल्हे व तालुके निर्मितीचे काम सध्या तरी थांबले आहे.
राज्यात होत असलेले नागरीकरण, वाढलेली लोकसंख्या, सुरू असलेली विकासकामे, यामुळे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या ताणामुळे कामे होण्यास विलंब होतो. त्यातून गैरप्रकार वाढीस लागतात. यावर उपाय म्हणून आणि नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागावीत, महसूल कार्यालयांची नव्याने पुनर्रचना अथवा निर्मिती करण्याबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींनीही शासनाकडे मागणी केली जात होती.
मात्र महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल करणे, नव्याने जिल्हा आणि तालुक्यांची निर्मिती करणे ही कामे खर्चिक आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी बाब आहे, असे म्हणत या मागणीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने 25 ऑक्टोबर 2023 रोजी उमांकात दांगट यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समितीची स्थापना केली होती. या समितीला 90 दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या.
पण कामाची व्याप्तीमुळे दिलेल्या कालावधीत समितीला काम पूर्ण करता आले नाही. त्यानंतर समितीला राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत समितीने 'तुकडाबंदी-तुकडेजोड' कायदा तसेच 'शेत जमीन कमाल धारणा कायदा' अशा दोन कायद्यांचा अभ्यास करून महत्त्वपूर्ण शिफारशींचा अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यानंतर महसूल विभागाची नव्याने पुनर्रचना करण्यासंदर्भात अभ्यास करून त्यावर अहवाल तयार करण्याचे काम समितीकडून सुरू होते.
त्याच दरम्यान, मुदत संपल्याचे कारण देत राज्य सरकारकडून ही समितीच बरखास्त करण्यात आली आहे. महसूल विभागाचे उप सचिव सत्यनारायण बजाज यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मध्यंतरी राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार नवीन तालुक्यांची निर्मिती होणार, 26 जानेवारीला याबाबत घोषणा राज्य सरकार करणार, अशा चर्चेला उधाण आले होते. त्यावर अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सध्या तरी कोणतेही नवीन जिल्हे किंवा तालुके निर्माण होणार नसल्याचे सांगितले होते. समिती बरखास्त केल्याने अजितदादांच्या या महितीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.