महावितरणचा ग्राहकांना आणखी एक शॉक
मुंबई : खरा पंचनामा
आधीच राज्यातील महावितरणकडून येणाऱ्या अव्वाच्या सव्वा वीज बिलामुळे सर्वसामान्य जनतेचं बजेट कोलमडत असून यातच आता महावितरणने आपल्या करोडो ग्राहकांना आणखी एक शॉक दिला आहे.
महाराष्ट्र प्रदेश वीज नियामक आयोगाने महावितरणला त्यांच्या सुमारे २ कोटी ७० लाख ग्राहकांकडून ५२७ कोटी ७३ लाख रुपये इंधन समायोजन शुल्क वसूल करण्यास परवानगी दिल्यामुळे आता फेब्रुवारीच्या बिलात एफएसी लावून ग्राहकांकडून वसुली करणार आहे. यामुळे घरगुती वीज ग्राहकांना प्रति युनिट एक रुपयापर्यंत अधिक पैसे द्यावे लागतील.
हवामान बदलामुळे नोव्हेंबर २०२४ मध्ये उकाडा होता. यामुळे विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. नियामक आयोगाने या वाढीचा अंदाज लक्षात घेता २२.२३ कोटींची अतिरिक्त वीज खरेदी करण्यास परवानगी दिली होती; परंतु लोडशेडिंग टाळण्यासाठी एकूण ५२७.७३ कोटी रुपयांची अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली.
महावितरणने १७ डिसेंबर, ३ जानेवारी, ८ जानेवारी आणि १४ जानेवारी रोजी याचिका दाखल करून ग्राहकांवर एफएसी लावण्यासाठी आयोगाकडे परवानगी मागितली होती. आयोगाने ही मागणी मंजूर केली. त्यांच्या आदेशाने म्हटले आहे की नोव्हेंबर २४ मध्ये २ हजार दशलक्ष युनिट्स (एमयू) खरेदी अधिक झाली. त्यावर अतिरिक्त खर्च झाला.
आता फेब्रुवारीच्या बिलात एफएसी लावून ग्राहकांकडून वसुली करणार आहे. याचा थेट परिणाम फेब्रुवारी आणि मार्चच्या वीज बिलांवर होईल. दुसरीकडे, १ एप्रिलपासून राज्यात नवीन वीज दर लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनावणीला सुरुवात झाली आहे. तथापि, यापूर्वी महावितरणनने ग्राहकांना जबर धक्का दिला आहे.
इंधन समायोजन शुल्क (प्रति युनिट)
घरगुती ग्राहक
बीपीएल - १५ पैसे
० ते १०० युनिटस - ४० पैसे
१०१ ते ३०० युनिट्स - ७० पैसे
३०१ ते ५०० युनिटस - ९० पैसे
५०० युनिट्सहून अधिक एक रुपया
एच.टी. औद्योगिक - ५५ ते ७० पैसे
व्यावसायिक - ६५ ते ९० पैसे
ईव्ही चार्जिंग - ६५ पैसे
हॉस्पिटल / शैक्षणिक - ५० ते ६५ पैसे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.