Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चंद्रकांतदादा अन् मोहोळांच्या युद्धात गजा मारणेचा बळी?

चंद्रकांतदादा अन् मोहोळांच्या युद्धात गजा मारणेचा बळी?



पुणे : खरा पंचनामा 

कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पण, मंत्री चंद्रकात पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या युद्धात गजा मारणेचा बळी गेला का? अशी शंका माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. तुरुंगात टाकणारे हीच लोक आहेत. बाहेर काढणारी सुद्धा हीच लोक आहेत, असं म्हणत धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, महापालिका निवडणुकीपूर्वी गजा मारणे तुरुंगातून बाहेर येईल, असा दावाही धंगेकर यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

रवींद्र धंगेकर म्हणाले, "पुण्यात आज गुन्हेगारी वाढली नाही. 10 ते 15 वर्षापासून विद्येच्या माहेरघरात गुन्ह्यांचे प्राबल्य वाढले आहे. पब, दारू, मटका, अंमली पदार्थाचा सुळसुळाट झाला आहे. सत्तेतील लोक अवैध धंद्यामध्ये भागीदार असल्याने हे सुरळीत सुरू आहे."

"गुंड गजा मारणेवर मकोका लावण्यात आला. यापूर्वी सुद्धा गजा मारणेवर मकोका लावण्यात आला होता. चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात युद्धात हा (गजा मारणे) बळी गेला का?" असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

"कोथरूडच्या निवडणुकीत अनेक मकोकाच्या आरोपींना तुरुंगातून चंद्रकांत पाटील यांनी बाहेर काढून प्रचारात गुंतवले होते. तुम्हाला प्रचारात गुन्हेगार चालतात. मग, आज हेच गुन्हेगार तुमच्या घरापर्यंत आल्यावर का चालत नाहीत? पुण्यातील अनेक गुन्हेगारांचा निवडणुकीसाठी वापर करण्यात आला. निवडून येण्यासाठी गुन्हेगारांचा वापर करायचा. नंतर त्याच गुन्हेगारांवर पुन्हा गुन्हे दाखल करायचे," असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

"एका व्यक्तीला मारहाण केल्यावर केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले. मोहोळ महापौर असताना गुन्हे घडत नव्हते का? तीनवेळा गजा मारणेवर मकोका दाखल करण्यात आला. आता हा मकोका किती दिवस टिकेल माहीत नाही. महापालिका निवडणुकीच्या आधी सेटलमेंट करून मारणेला सोडू शकतात," असा दावा धंगेकर यांनी केला आहे.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार) अध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर सुद्धा मकोका होता. पण, निवडणुकीत मानकर हे तुरूंगातून बाहेर आले. मानकर कसे सुटले? तुरूंगातून बाहेर आल्यावर दुसऱ्या दिवशी मानकर प्रचार करत होते. म्हणजे तुरुंगात सुद्धा तुम्हीच टाकता आणि सोडवता सुद्धा तुम्हीच," असे म्हणत धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे.

"पुणे गुन्हेगारांच्या विळख्यात घालण्याचे काम तुम्ही केले. गुन्हेगारांचा वापर करणे चुकीचं आहे. निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांच्या घरात गुन्हेगार घुसले होते. हे बरोबर होते का? तेव्हा पोलीस गप्प होते. तुम्ही आनंदाने गुंडांचा वापर केला. हे गुंड तुमच्या घरापर्यंत आल्यावर तुम्ही कारवाई करत आहात," असे म्हणत धंगेकर यांनी पाटील आणि मोहोळ यांच्यावर निशाणा साधला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.