कर्नाळमधील खुनप्रकरणी चौघाना अटक
सांगली ग्रामीण पोलिसांची अवघ्या 12 तासात कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कर्नाळ (ता. मिरज) येथे जमीन हद्दीकरिता शेतात खांब रोवण्याच्या कारणावरुन सख्ख्या चुलत भावावर कोयत्याने हल्ला करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या चौघांना ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद केले.
सत्यजित विकास कांबळे (वय २२, रा. कर्नाळ) मृताचे नाव आहे. याप्रकरणी शुभम शैलेश कांबळे (वय २४), सोमेश शैलेश कांबळे (वय १९), स्वराज उर्फ कुणाल बाळासाहेब कांबळे (वय २१, सर्व रा. जुन्या पाण्याच्या टाकीजवळ, कर्नाळ) आणि हणमंत दिगंबर गायकवाड (वय १८ वर्षे ४ महिने, रा. समर्थ कॉलनी, शंभर फुटी रस्ता, सांगली) यांना अटक केली. तसेच याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विकास बाबूराव कांबळे (वय ५६, रा. कर्नाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवार दि. १८ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास विकास कांबळे आणि त्यांचा मुलगा सत्यजीत हे कर्नाळ ते डिग्रज रस्त्यालगत असणाऱ्या त्यांच्या शेतात हद्दीचे खांब लावत असताना तेथे संशयित हातात कोयता आणि काठ्या घेवून आले. संशयितांनी दोघांना, तुम्ही हद्दी कायम करण्यासाठी शेतात खांब का लावत आहात असे विचारून वाद घातला. दरम्यान अचानक संशयित शुभम कांबळे याने त्याच्याकडील कोयत्याने सत्यजित याच्या डोक्यात पाठीमागे दोन वार केले. शुभम याने केलेला तिसरा वार सत्यजित याने चुकविला. मात्र संशयित कुणाल कांबळे याने त्याच्याकडील काठीने सत्यजीत याला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेला सत्यजित खाली कोसळला. यावेळी सत्यजित याला वाचविण्यासाठी त्याचे वडिल विकास कांबळे तसेच सत्यजित याचे नातेवाईक मध्ये पडले असता त्यांच्यावरही संशयितांनी हल्ला चढवून त्यांना जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले.
गंभीर जखमी झालेल्या सत्यजित यास नातेवाईकांनी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना बुधवार दि. १९ रोजी रात्री ८ च्या सुमारास सत्यजित याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी ग्रामीण पोलीस ठाण्यात सत्यजित याचे वडिल विकास कांबळे यांनी खूनी हलल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी मंगळवारी रात्रीच हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी शोध मोहिम सुरु केली होती. दरम्यान कर्नाळ ते बुधगाव जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे पुलानजीक लपून बसलेल्या संशयित शुभम कांबळे आणि सोमेश कांबळे यांना अटक केली. तसेच बसस्थानक परिसरातून संशयित कुणाल कांबळे, हणमंत गायकवाड यांना अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत चौघाही संशयितांनी जमिन हद्द वादातून सत्यजित कांबळे याच्यावर कोयता आणि काठीने हल्ला केल्याची कबुली दिली. प्रारंभी चौघांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान सत्यजित याचा मृत्यू झाल्याने संशयित हल्लेखोरांवर खूनाचा गुन्ह्यातील कलमे वाढविण्यात आली.
संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली. तसेच अल्पवयीन युवकास ताब्यात घेवून त्याची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.