जीप, दुचाकी चोरणाऱ्या राजस्थानमधील एकाला अटक
सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हे उघड : 15.72 लाखांची वाहने जप्त
इस्लामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर शहरातून जीप चोरी करणाऱ्या राजस्थान येथील एकाला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार पसार झाला आहे. अटकेतील चोरट्याकडून सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील 7 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली. इस्लामपूर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले जात आहे.
लालचंद सुवालाल जाट (चौधरी) (रा. वार्ड नं ५, धानी खादरवाली ता. घरटकनेत, जिल्हा सिकर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार बनवारी मोहनलाल मिना (रा. वार्ड नं १३ पचार ता. पचार, जि. सिकर, राजस्थान) पसार झाला आहे. इस्लामपूर येथील अभिजित पाटील यांची बोलेरो जीप दि. 6 मार्च रोजी अज्ञाताने चोरून नेली होती. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्याना पकडण्याच्या सूचना इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी निरीक्षक हारूगडे यांना दिल्या होत्या. निरीक्षक हारूगडे यांनी यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे खास पथक तयार केले होते.
पथकाला इस्लामपूर येथून चोरलेली बोलेरो कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन शहापूर पोलिसांच्या मदतीने चोरट्याला पकडण्यासाठी सापळा रचला. चोरलेली बोलेरो घेऊन जाताना जाट याला पथकाने थांबवले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने मिना याच्या मदतीने सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातून जीप, दुचाकी चोरल्याची कबुली दिली. मिना मात्र पसार झाला होता. जाट याच्याकडून दोन जीप, 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडून इस्लामपूर, कासेगाव, शिक्रापूर, शहापूर, कराड, रांजणगाव येथील 7 गुन्हे उघडकीस आणण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले.
इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, राजाराम हांडे, जालींदर माने, शशीकांत शिंदे, अमोल सावंत, दिपक घस्ते, विशाल पांगे, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विवेक सांळुखे, सीसीटीव्ही कक्षकडील स्नेहा पाटील, आरती शिंदे, हातकणंगले पोलीस ठाण्यातील समीर मुल्ला, विकी भंडारे, अमित भोरे, सागर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.