हजामती करत होता का? त्याने झक मारल्यावर संरक्षण का दिले?
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी, दंगली तसेच कॉमेडियन कुणाल कामराच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोमवारी विधानसभेत चांगलेच संतापले. अत्यंत संयमी नेते म्हणून ओळख असलेल्या जयंत पाटलांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार प्रहार करत खडेबोल सुनावले.
जयंत पाटील यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचा हवाला दिला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते. त्यांची धर्मावर श्रध्दा होती. देवदेवता, साधुसंतांची पूजा करायचे. धर्मासाठी दान देत होते. याचा अर्थ त्यांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला, अशीही कुठेही एकही ओळ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मशिदींना मदत केल्याच्या नोंदी आहेत.
स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काय-काय करायचे आणि आपल्या मर्यादा किती सोडायच्या, त्यांचे ते काम सरकारने किती काळ बघावं, याला काही टाईमलिमीट ठेवावं. निवडणूक झाली, सगळं जिकडं तिकडं झालं. ज्यांचा पराभव करायचा, त्यांचा पराभव तुम्ही केला. आता पुन्हा त्याच गोष्टी उगाळणे योग्य त्यांचा पराभव तुम्ही केला. आता पुन्हा त्याच गोष्टी उगाळणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.
2024 मध्ये 69 जातीय दंगली झाल्या. त्यातल्या 12 दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत. गुजरातमध्ये पाच दंगली झाल्या. या दंगली का होतात, कशा होतात, महाराष्ट्राचा आकडा वर जातोय, यातून महाराष्ट्रातील खाली किती अस्वस्थता निर्माण झाली आहे, हेही पाहायला हवे. अमरावती, नागपूरमध्ये दंगल झाली. नागपूरच्या दंगलीत असे सांगण्यात आले की, हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता का, असा सवाल पाटलांनी उपस्थित केला.
पूर्वनियोजित कट म्हणजे नियोजन आहे. त्यासाठी कुठेतरी बसले असतील. पोलिस खातं काय करत होतं. पोलिसांना पूर्वनियोजित कट आधी पकडता आला तर ते पोलिस खातं. म्हणजे आपणच कबुल करतोय. नागपूरसारख्या शांत प्रवृत्तीच्या शहरात दंगल झाली म्हणजे करणाऱ्यांचं कौतुक आहे. सगळ्यात टॉप स्कील वापरली. त्यांचा खऱ्याअर्थाने सत्कारच करायला हवा, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरच्या विधानांवर बोलताना असताना मागे बसलेल्या सदस्यांनी कोरटकरला अटक झाल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पाटील संतापले. अटक केली असेल तर तसे सरकारने सांगावे. पण त्याला एवढा उशीर का झाला? त्याने झक मारल्यावर संरक्षण का दिले, असा प्रहार पाटलांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांवर इतक्या वाईट पध्दतीने बोलल्यानंतर त्याला दहा-वीस जणांचे संरक्षण, काय चाललंय काय महाराष्ट्रात ? सरकारला काय अभिप्रेत आहे, हे यातून अधोरेखित होतेय. कॉमेडियनवर लगेच गुन्हा दाखल झाला. पण सोलापूरकर, कोरटकरवर लगेच गुन्हा झाला नाही. मागील तीन वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांवर, आमच्या महारापुरुषांवर संतांवर जे-जे बोलले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची घोषणा सरकारने आज करावी आणि उद्या सकाळपर्यंत गुन्हा दाखल करून दाखवावा, असे पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांचे भाषण झाल्यानंतर विधानसभेच्या तालिका अध्यक्षांनी झक मारला हा शब्द कामकाजातून काढण्याबाबत सांगितले. त्यावर जयंत पाटील यांनी झक मारणे हा शब्द मागे घेतो, त्याऐवजी मासे मारणे, असे म्हणावे, असे सांगितले. मासे मारणे म्हणजेच झक मारणे असेही ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.