आगीमुळे सापडला अलीबाबाचा खजिना!
न्यायाधीशाच्या घरी सापडली बेहिशेबी रोकड, सर्वोच्च न्यायालयाची कारवाई
दिल्ली : खरा पंचनामा
सुप्रिम कोर्टाने न्यायाधीश यशवंत वर्मा यांची तत्काळ बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड सापडली. दिल्लीतील तुघलक रोड येथे राहणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी 14 मार्चच्या रात्री अचानक आग लागली.
त्या वेळी ते शहराबाहेर होते. घरच्यांनी त्वरित अग्निशमन दलाला बोलावले. आग आटोक्यात आल्यानंतर घरातील एका खोलीत मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस आणि तपास यंत्रणांनी तातडीने चौकशी सुरू केली. त्यानंतर संपूर्ण देशात हा प्रकार चर्चेचा विषय ठरला.
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च रोजी आपत्कालीन बैठक झाली. या बैठकीत न्यायाधीश वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गृह मंत्रालयाने यासंबंधी अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर केला. मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांनी या प्रकरणावर गंभीर दृष्टीक्षेप टाकला. न्यायाधीश वर्मा यांना त्यांच्या मूळ अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याचा निर्णय झाला.
यशवंत वर्मा यांच्या विरोधात कारवाई झाल्याने त्यांच्यावर आणखी मोठी चौकशी होण्याची शक्यता आहे. या वादळात न्यायाधीश वर्मा यांनी शुक्रवारी न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या कर्मचारी वर्गाने कोर्टात येऊन आज कामकाज होणार नसल्याचे जाहीर केले. न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकारी यावर पुढील पावले उचलणार आहेत. गृह मंत्रालयाकडून तपासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
संबंधित न्यायाधीशाकडून प्रथम खुलासा मागितला जातो. खुलासा समाधानकारक नसल्यास अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली जाते. समितीला वाटले की, हा गैरप्रकार गंभीर आहे आणि राजीनामा आवश्यक आहे, तर न्यायाधीशाला पद सोडण्यास सांगितले जाते.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात इन-हाउस चौकशी समिती स्थापन होण्याची शक्यता आहे. या चौकशीनंतर पुढील कठोर कारवाई होऊ शकते. जर भ्रष्टाचार सिद्ध झाला, तर न्यायमूर्तीना पदावरून हटवले जाऊ शकते. हे प्रकरण भारतीय न्यायसंस्थेतील एक मोठे वादग्रस्त प्रकरण ठरू शकते. त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालय आणि न्यायव्यवस्था काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.