अल्पवयीन मुलाने दोन भावांवर झाडल्या गोळ्या
श्रीरामपूर : खरा पंचनामा
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर याठिकाणी गोळीबाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलाने दोन भावांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक भाव जखमी झाला आहे, तर दुसरा भाऊ थोडक्यात बचावला आहे.
गुरुवारी भर दिवसा हा गोळीबाराचा थरार घडला आहे. या गोळाबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना श्रीरामपूर शहरातील भैरवनाथनगर परिसरात घडली आहे. इथं एका अल्पवयीन मुलाने दोन भावांवर दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी एका भावाच्या पायाला लागली, तर दुसरी गोळी हुकवण्यास दुसऱ्या भावाला यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचं कुटुंब भैरवनाथनगर परिसरात वास्तव्याला आहे. याच भागात पीडित तरुणाची आत्याही राहते. आत्याने या भागात स्वतःच्या घराचं बांधकाम सुरू केलं आहे.
घटनेच्या दिवशी हे दोन्ही भाऊ आपल्या आत्याच्या घराची देखरेख करण्यासाठी साईटवर आले होते. गुरुवारी दुपारी अल्पवयीन आरोपी त्याठिकाणी आला, तिथे त्याने एका भावाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याने एका भावाच्या दिशेनं गोळीबार केला. पहिली गोळी एका भावाच्या पायाला लागली. यावेळी दुसरा भाऊ घटनास्थळावरून पळून जाऊ लागला. तेव्हा अल्पवयीन मुलाने पळून जाणाऱ्या भावाच्या दिशेनं दुसरी गोळी झाडली.
सुदैवाने ही गोळी दुसऱ्या भावाला लागली नाही. गोळीबाराच्या या घटनेनंतर गोळीबारातून बचावलेल्या भावाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.