Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"जयंतराव तुम्ही दादांचं ऐकत नाहीत आणि माझंही ऐकत नाहीत हा तुमचा प्रॉब्लेम आहे"

"जयंतराव तुम्ही दादांचं ऐकत नाहीत आणि माझंही ऐकत नाहीत हा तुमचा प्रॉब्लेम आहे"



मुंबई : खरा पंचनामा 

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत चालू असून त्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये कधी कलगीतुरा, कधी खडाजंगी तर कधी सहमती पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यामुळे सुरुवात वादळी झाली. आज त्याच राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला न सांगता माध्यमांना सांगितलं यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. यानंतर दुपारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावण्यासाठी प्रसिद्ध मराठी गझलकार सुरेश भट यांची एक गझल ऐकवताच सभागृहात तुफान हशा पिकला !

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अवस्थेवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्यावर खोचक टिप्पणी केली. "आपण शेतकऱ्यांकडून मागच्या काळात वीजबिल वसूल न केल्यामुळे आपल्या सरकारी कंपनीवर ७५ हजार कोटींचं कर्ज आहे. पण ते हळूहळू आपण व्यवस्थित करू. आपला प्रयत्न असा आहे की सरकारनं थोडा पाठिंबा दिला तर देशात आपली पहिली वीज कंपनी असेल जी आपण स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करू आणि तिथून आपण पैसे उभे करू. हा आपला प्रयत्न आहे. त्या दिशेनं आपलं काम चालू आहे", असं फडणवीस म्हणाले.

यासाठी कंपनीचं व्हॅल्युएशन चालू असल्याचं फडणवीसांनी सांगताच समोर बसलेल्या जयंत पाटील यांनी "त्या वेळी तुमच्या मनात होतं, पण झालं नाही. २००३ सालीही त्याचं व्हॅल्युएशन झालं होतं", असं सांगितलं. तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा संदर्भ देत यावर देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

"जयंतराव तुमचा प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर बाजूला बसलेल्या अजित पवारांनी लागलीच "माझ्यासारखं करत नाहीत ते", असं म्हणताच सभागृहात मोठा हशा पिकला. त्यावर फडणवीसांनीही लागलीच "तुम्ही दादांचं ऐकत नाहीत आणि माझंही ऐकत नाहीत हा तुमचा प्रॉब्लेम आहे", अशी पुस्ती जोडली आणि पुन्हा हशा पिकला !

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी जयंत पाटलांना महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून टोला लगावला. "जयंतरावंसारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये. रोहित दादा वगैरे ठीक आहेत. त्यांनी शंका उपस्थित केली तरी चालू शकतं. ते अनभिज्ञ आहेत असं नाही. पण ते तुलनेनं तरुण आहेत. त्यामुळे तरुण माणसानं केलं किंवा वरुणने केलं (वरूण सरदेसाई) तर चालू शकतं. पण तुम्ही तरी तसं करू नये", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी फडणवीसांनी सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांची एक गझल ऐकवताच सत्ताधारी व विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्यावर दिलखुलास दाद दिली.

"आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट म्हणतात...
साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंकेखोर जे, त्यांचे कधी झाले बरे?"

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.