माजी आमदारांसह चौघांवर गुन्हा दाखल
पाथरी : खरा पंचनामा
साईबाबा विकास आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.12) शहरातील पालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकी दरम्यान काही वादग्रस्त मुद्दे उपस्थित झाले होते.
बैठक संपताच प्रवेशद्वारावर संतप्त झालेल्या माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह त्यांचे समर्थक व शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद उद्भवून तो प्रकार हाणामारीपर्यंत पोहचला. दरम्यान शिवसेनेचे अलोक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह चौघा जणांवर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर सुरू असलेल्या वाद-प्रतिवादाचा भडका यानिमित्ताने समोर आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्हाधिकारी गावडे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पालिकेच्या सभागृहात साईबाबा विकास आराखड्यासंदर्भात शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विकास आराखड्यावर चर्चा सुरू होती. बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत शहरातील शॉपिंग कॉप्लेक्स व घरकुल घोटाळ्याचा मुद्दा शिवसेनेचे अलोक चौधरी यांनी उपस्थित केला. त्यावरून तेथेच वादाची ठिणगी पडण्यास सुरूवात झाली होती. मात्र बैठकीचा विषय वेगळा असल्याने इतरांनी हस्तक्षेप करून वादाचा विषय थांबविला.
दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही बैठक संपल्यानंतर नागरिकांसह सर्वच पदाधिकारी सभागृहातून खाली प्रवेशद्वारासमोर आले होते. त्याचवेळी अलोक चौधरी हे देखील तेथे आले असताना माजी आ. बाबाजानी व त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे दोन्ही समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी उडून हे प्रकरण धक्काबुक्की व मारहाणीपर्यंत पोहचल्याने मोठा जमाव एकत्र आला होता. दोन्ही बाजूंनी जोरजोरात ओरडून धमक्या दिल्या जात होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेचे राज्य सचिव आसेफ खान, जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ घांडगे, एकनाथ शिंदे, अमोल भाले पाटील, विक्रम पाटील, शाकेर सिद्दीकी, लक्ष्मण तिडके, शेख खालेद, हसिफ खान आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.