"साहेब, तेव्हापासून माझे मन कशात लागत नाही"
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबतही मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न चर्चेत आला आहे. अलीकडेच जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने मोठा दावा केला आहे.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदानावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जयंत पाटलांनी भेट दिली आणि आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. माझी गॅरंटी घेऊ नका. माझे काही खरे नाही. कारण काय तर तुम्हाला माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणेही जरा धोक्याचे आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्यासंदर्भात एक दावा केला आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, जयंत पाटील विधानसभा निवडणुकीनंतर नाराज आहेत हे नक्की. मला नागपूरला त्यांनी एकदा बोलून दाखवले होते की, मुश्रीफ साहेब माझे मन कशात लागत नाही. सत्तेत नसताना पाच वर्ष पक्ष टिकवणे व हे सर्व टिकून राहणे फार अवघड आहे, याची त्यांना कल्पना आली असावी. त्यांचे मन परिवर्तन होणार का हे आता त्यांनाच विचारावे लागेल, असे मुश्रीफ म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.