अॅट्रॉसिटी प्रकरणाच्या तपासात दिरंगाई; पोलिस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
गोंदिया : खरा पंचनामा
पोलिसांच्या चुकीमुळे खून आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा तपास 90 दिवसांत पूर्ण केला नाही. त्यामुळे त्या आरोपीला जामीन मिळाला. या प्रकरणात तपासात दिगंराईस जबाबदार असलेल्या तिरोडाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली.
तिरोडा तालुक्यातील भिवापूर नाल्याजवळ 24 नोव्हेंबर 2024 च्या सकाळी सुनील चंद्रकुमार तुमडे (वय 32, रा. भुराटोला) याचा मृतदेह डांबरी रस्त्यापासून काही अंतरावर आढळला. त्याचा डोक्यावर कशाचा तरी मोठा घाव होता. तिरोडा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला. 26 नोव्हेंबर 2024 ला वैष्णवी गणेश सुरणकार (19, रा. भिवापूर) व 27 नोव्हेंबर 2024 ला मंगेश माणिकचंद रहांगडाले (24, रा. भुराटोला) या दोघांना अटक केली.
दरम्यान, 27 नोव्हेंबरला दिवाणी व फौजदारी न्यायालय वर्ग 1 तिरोडा यांच्या समोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मृत व्यक्ती आदिवासी असल्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याची नोंद करण्यात आली. अॅट्रॉसिटीचे प्रकरण असल्याने तपास उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला. खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला पोलिस रिमांड झाल्यापासून 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. अन्यथा आरोपी हा जामिनावर सुटण्यास पात्र असतो.
25 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्यापूर्वी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक होते. परंतु पोलिसांनी तसे केले नाही. संधीचा फायदा घेत मंगेश रहांगडाले याचे वकील अॅड. चव्हाण यांनी सोमवारी (दि. 3) जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद केला. तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखवत 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे युक्तिवाद ऐकून बुधवारी (दि. 5) मंगेशला जामीन मंजूर केला.
या सर्व प्रकरणानंतर तिरोडाचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कारणे दाखवा नोटीस काढून त्यांनी गुन्ह्याचा तपास 90 दिवसांत का पूर्ण केला नाही? याचे स्पष्टीकरण येत्या 7 दिवसांत दाखल करण्यास सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.