Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच'

'सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच'



परभणी : खरा पंचनामा

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे. परभणीच्या नवामोंढ पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीना मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला. आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून उत्तर मागितलं आहे. "परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली" असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हा 451 पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे.

परभणीत संविधान अवमाननेच्या घटनेनंतर आंदोलन झालं होतं. या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी यासाठी आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी जानेवारी महिन्यात परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढला होता.

न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशीना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. एका माथेफिरूने 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती, आणि त्याविरोधात 11 तारखेला परभणीत आंदोलन करण्यात आलं होतं.

न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. दबाव आल्यानंतर दोन महिन्यांनी तीन पोलिसांचे निलंबन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक कर्तिकेश्वर तूरनर, पोलीस कर्मचारी सतीश दैठणकर, मोहित पठाण, राजेश जठाल यांचे निलंबन करण्यात आलं होतं. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना यापूर्वी निलंबित केलं होतं.

"या प्रकरणात ज्या काही शंका उपस्थित झाल्या आहेत, त्याचं निरसन झालं पाहिजे म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी होईल" अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.