"जातीपातींना राजकीय हत्यार म्हणून वापरणे बंद करा"
अमरावती : खरा पंचनामा
समाजातील जातीपातींना राजकीय हत्यार म्हणून वापरणे बंद करा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांना दिला आहे. आपल्या स्वार्थासाठी या जातीपातीच्या राजकारणाचा वापर करून घेणाऱ्या राजकीय नेत्यांवर गडकरी यांनी टीका केली.
राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याऐवजी लोकांमध्ये अंतर निर्माण केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अमरावती येथे डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरिअल पुरस्कार सोहोळ्यात ते बोलत होते. राजकारणाची पुन्हा एकदा व्याख्या करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेता नितीन गडकरी शनिवारी म्हणाले की, लोक जातीयवादी नसतात तर राजकीय नेतेच जातीयवादी असतात. आपल्या स्वार्थासाठी राजकीय नेते जातीयवादी होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कोण सर्वाधिक मागास आहे, हे सिद्ध करण्याचीच सध्या स्पर्धा लागली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
वास्तविक, ही सामाजिक असमानता संपवण्याची गरज आहे. जाती-जातींमधील हे भेद संपवायला हवेत. आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी, असे ते म्हणाले. जाती व्यवस्थेला राजकीय हत्यार म्हणून वापरण्याच्या वृत्तीवर गडकरींनी टीका केली. समाज सुधारण्याऐवजी निवडणुकीत यश मिळावे म्हणून समाजात फूट पाडली जात आहे. मात्र, याचे समाजावर दूरगामी परिणाम होत आहेत. हे टाळण्यासाठी राजकारण पुनर्परिभाषित करायला हवे, असेही गडकरी म्हणाले. आज राजकारणात केवळ व्होट बँकेचे राजकारण चालते. विकासापेक्षा याला प्राधान्य मिळते आहे. त्यामुळेच एखाद्या समाजाचे मागासलेपण हे सामाजिक विषय न राहता त्याला राजकारणासाठी फायद्याचा सामाजिक विषय न राहता त्याला राजकारणासाठी फायद्याचा विषय म्हणून वापरले जात आहे.
गडकरी म्हणाले की, राजकारणातील जे खरे नेतृत्व आहे त्याला जाहिरातीची गरज नसते. राजकारणात स्वतःच्या जाहिरातीपेक्षा समाजसेवेला जास्त महत्त्व असायला हवे. त्यामुळे नेता आपोआप मोठा होत जातो. पण, आज अनेक नेते राजकीय लाभासाठी आपल्याच समाजाला मागस सिद्ध करण्याची शर्यत लावत आहेत.
मी देखील निवडणूक लढवली आहे. आणि लोकांना तेव्हाच सांगितले की, मी माझ्या तत्त्वांवरच राजकारण करेन. मग त्यांनी मला मत द्यावे किंवा नाही, हा त्यांचा निर्णय असेल. कोणाशीही पक्षपातीपणे न वागणे तसेच कसलीही तडजोड न करणे हे एक राजकीय नेता म्हणून माझे कर्तव्य आहे. कारण, राजकारण हे केवळ निवडणुका जिंकण्यापुरते मर्यादित असता कामा नये. याचा उद्देश वेगळा आहे. आणि यासाठी होणारा अतिरिक्त खर्च थांबला पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.