नागपूर हिंसाचारातील कथित मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई
नागपूर : खरा पंचनामा
मागील सोमवारी (17 मार्च) महाल आणि हंसापुरी येथे झालेल्या दंगल आणि जाळपोळीच्या घटनेचा मुख्य आरोपी फहीम खान याला पोलिसांनंतर आता प्रशासनाकडूनही मोठा फटका बसणार आहे.
उत्तर प्रदेशप्रमाणेच नागपुरातही गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याच्या दृष्टीने ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे. नागपूर महानगरपालिकेच्या पथकाकडून फहीम खानच्या घरावर तोडकामाची कारवाई प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, तोडकामापूर्वी फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी रात्रीच घर रिकामे केले होते. हे घर फहीम खानच्या आईच्या नावावर होते. यासोबतच EWS योजनेअंतर्गत NITने खान कुटुंबाला ही जागा 30 वर्षांच्या लीजवर दिली होती. कारवाईपूर्वी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी, यासाठी यशोधरानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे.
हिंसाचारानंतर नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 20 मार्चला फहीम खानच्या घराची पाहणी करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या उल्लंघनाचा अहवाल सादर केला होता. या घरासाठी कोणताही अधिकृत बांधकाम परवाना मंजूर करण्यात आलेला नसल्यामुळे हे अनधिकृत बांधकाम असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला होता. नागपूर पोलिसांनी फहीम खानच्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शी संबंधित दंगलखोरांनी वापरलेली दोन दुकानांना टाळे लावले. त्यानंतर आता नागपूर महापालिकेने दोन जेसीबीच्या मदतीने फहीम खानच्या घरावर तोडकाम कारवाई सुरू केली आहे.
सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून ही कारवाई सुरू असून, संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेने 21 मार्च रोजी फहीम खानच्या आईच्या नावावर असलेल्या 86.48 चौरस मीटरच्या बेकायदेशीर घरावर नोटीस बजावली होती. आता ही कारवाई वेगाने सुरू असून, यामधून सरकारने दंगेखोरांना कठोर इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.