शिकारी खुद यहाँ शिकार हो गया !
सायबर ठगालाच लुटलं; आरोपीच रडला
कानपुर : खरा पंचनामा
सायबर ठगांकडून अनेकांची लुबाडणूक केल्याच्या घटना आतापर्यंत तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील. पण सध्या एका सायबर ठगालाच एका तरुणाने लुटल्याचं समोर आलंय. कानपूरमध्ये हा प्रकार घडला. तरुणाला लुटण्यासाठी सायबर गुन्हेगाराने कॉल केला होता. पण चाणाक्ष तरुणाच्या लक्षात येताच त्याने हजरजबाबीपणे सायबर गुन्हेगारालाच आपल्या जाळ्यात ओढलं. इतकंच नाही तर त्याच्याकडून पैसेही घेतले.
भूपेंद्र सिंग असं तरुणाचं नाव असून त्याला ६ मार्च रोजी अचानक एक फोन कॉल आला. फोन कॉल उचलताच त्याला पलिकडून सीबीआय अधिकारी असल्याचं सांगण्यात आलं. भुपेंद्रला सायबर गुन्हेगार असल्याची शंका आली. त्या कथित सीबीआय अधिकाऱ्याने भुपेंद्रला तुझे अश्लील व्हिडीओ आमच्याकडे आहेत आणि गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं.
भुपेंद्रकडे सायबर गुन्हेगारांनी १६ हजार रुपयांची मागणी केली होती. त्याला एफआयआर कॉपीही पाठवली गेली. ती एफआयआर कॉपी बनावट होती. सायबर गुन्हेगाराला भुपेंद्र आता पैसे पाठवेल असं वाटलं. पण इकडे भुपेंद्रने त्यालाच जाळ्यात ओढलं.
भुपेंद्रने सायबर गुन्हेगाराकडे एक दिवसाचा वेळ मागितला आणि घरातून चोरी केलेले दागिने गहाण ठेवून पैसे जमा करायला लागतील सांगितलं. पुढच्याच दिवशी पुन्हा आरोपीने कॉल केला. तेव्हा भुपेंद्रने ठगाकडूनच ३ हजार रुपयांची मागणी केली. प्रोसेसिंग फीसाठी पैसे हवे असल्याचं सांगितलं.
सोन्याची चेन गहाण ठेवल्यानंतर तरुण आपल्याला पैसे पाठवेल म्हणून ठगाने भुपेंद्रला पैसे पाठवले. त्यानंतर भुपेंद्रने आणखी एक नाटक केलं. मी अल्पवयीन असल्याचं सराफाला वाटतं आणि त्याने आई-वडिलांना बोलावलंय. त्यामुळे तूच वडील बनून सराफाशी बोल असं भुपेंद्रने ठगाला सांगितलं. त्यात ठग असा फसला की त्याने आणखी ४५०० रुपये पाठवले.
भुपेंद्रने ठगाकडून आतापर्यंत साडेसात हजार रुपये घेतले. दरम्यान, १० मार्चला ठगानेच फोन करून भुपेंद्रकडे मी पाठवलेले पैसे परत पाठव म्हणून तगादा लावला. तेव्हा भुपेंद्र म्हणाला की, चेन ठेवून १ लाख १० हजार रुपये कर्ज मिळेल पण त्यासाठी आणखी पैसे द्यावे लागतील. तेव्हा ठगाने पुन्हा ३ हजार रुपये भुपेंद्रला पाठवले.
भुपेंद्रला लुटायचा प्लॅन केलेल्या ठगाला जेव्हा आपणच फसलो असल्याचं लक्षात आलं तेव्हा तो रडू लागला. माझी बायको मुलं आहेत. मी बायकोला काय सांगू? असं म्हणत गयावया करायला लागला. यानंतर भूपेंद्रने पोलिसांना माहिती दिली आणि त्याला मिळालेले पैसे गरजूला देणार असल्याचं सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.