नात्यातील मुलीला छेडणे पडले महागात, मामानेच घेतला भाच्याचा बळी
संशयित मामासह मुलाला अटक
सांगली : खरा पंचनामा
नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून मामानेच मुलासोबत मिळून भाच्याचा बळी घेतला. मंगळवारी दुपारी कुपवाड येथे ही घटना घडली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी मृत तरुणाच्या मामासह त्याच्या मुलाला अटक केली आहे.
राहूल आप्पासाहेब सुर्यवंशी (वय ३८, मूळ गाव येडूर मांजरी, कर्नाटक. सध्या रा.प्रकाशनगर गल्ली नं ३, कुपवाड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा मामा संदीप रावसाहेब सावंत (वय ५२), सौरभ संदीप सावंत (२२, दोघेही रा.प्रकाशनगर गल्ली नं.३,कुपवाड) यांना अटक करण्यात आली आहे.
राहूल सुर्यवंशी हा मूळचा कर्नाटक येथील येडूर मांजरीचा आहे. त्याची आई व भाऊ हे दोघे गावी राहतात. गेल्या काही महिन्यापूर्वी राहूल सुर्यवंशी हा कामानिमीत्त कुपवाड येथे आला होता. तो कुपवाड औद्योगिक वसाहत मधील एका कंपनीत काम करीत होता.आज (मंगळवारी) सुट्टी असल्याने तो घरी एकटाच होता. राहूल गेल्या आठ-दहा दिवसापासून नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढीत होता. पिडित मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी राहूल याला वेळोवेळी समज दिली होती. तरीही तो ऐकत नव्हता.
मंगळवारी दुपारी राहूल सुर्यवंशी याने पिडित मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नातेवाईक असलेला त्याचा मामा संदीप सावंत व मुलगा सौरभ सावंत याच्या निदर्शनास आला. संशयित सौरभ सावंत याचा राग अनावर झाला. सौरभ याने रागाच्या भरात सुर्यवंशी याला पकडून मारहाण केली. तर संशयित संदीप सावंत याने लोखंडी रॉडने हल्ला केला. संशयित सौरभ याने शेजारी पडलेला दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. राहूल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच संशयित पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहूलला त्यांनी आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर संशयित आरोपी सौरभ सावंत व संदीप सावंत यांना तातडीने ताब्यात घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.