गोगावलेंचं 'पालकमंत्रिपदाचं' स्वप्न धुळीस!
फडणवीसांचा तटकरेंना पाठिंबा
मुंबई : खरा पंचनामा
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे शब्द टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि आमदार भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला आहे.
२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना दिले होते. यामुळे शिवसेनेचे रायगडमधील आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीने पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला खतपाणी घातले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर काही काळ राष्ट्रवादी सत्तेबाहेर होती, पण अजित पवार यांनी २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट घडवून महायुतीत प्रवेश केला. यानंतर आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या, आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा पेटला.
शिंदे सरकारच्या सुरुवातीच्या काळात रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेचे उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले, ज्यामुळे तटकरे कुटुंबीयांना धक्का बसला. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये फडणवीस सरकारने पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली, तेव्हा आदिती तटकरे यांचे नाव रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी समोर आले. यावर गोगावले समर्थकांनी तीव्र आक्षेप घेत आंदोलने केली, आणि अवघ्या २४ तासांत हे पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आले.
११ एप्रिल २०२५ रोजी अमित शहा रायगड दौऱ्यावर आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी रायगड किल्ल्यावर उपस्थित राहिलेल्या शहांनी सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आटोपला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते, पण गोगावले यांनी या भोजनाला दांडी मारली, ज्यामुळे त्यांची नाराजी पुन्हा स्पष्ट झाली.
महायुतीत पालकमंत्रिपदांचे वाटप करताना राष्ट्रवादीकडे सर्वात कमी पालकमंत्रिपदे असल्याचे फडणवीस यांनी शहांना सांगितल्याची माहिती आहे. यापूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याकडे होते, ते आता शिंदे गटाच्या प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला देणे भाग आहे, असा युक्तिवाद फडणवीसांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.